पुणे: पत्नीने दुसरा विवाह करुन फसवणूक केल्याने एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना वडगाव शेरी परिसरात घडली. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी पत्नीसह दोघांविरोधात गुन्हा दाखल केला. सिडनी लाॅरेन्स दोरायराज (३९, रा. शिलानंद हाऊसिंग सोसायटी, सोमनाथनगर, वडगाव शेरी) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. याबाबत सिडनी यांचा मोठा भाऊ स्टॅन्ली लाॅरेन्स दोरायराज (४१) यांनी चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, स्वाती सिडनी दोरायराज (३२) आणि चेतन मोरे (३५, रा. श्रीनिवास टेनामेंट, बडोदा, गुजरात) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वाती आणि सिडनी यांचा २०१४ मध्ये विवाह झाला होता. त्यानंतर स्वातीचे चेतन मोरे याच्याशी प्रेमसंंबंध जुळले. कायदेशीर घटस्फोट न घेता, आरोपी चेतन मोरे याच्यासोबत ती राहू लागली. ‘दुसरा विवाह केल्यानंतर मी खुश नाही. मला त्याच्यासोबत राहायचे नाही. मी परत येणार आहे’, असे तिने पती सिडनी याला सांगितले. त्यानंतर स्वातीने तिचा दुसरा पती चेतन याच्याशी संगनमत करुन सिडनीकडून वेळोवेळी १५ लाख १८ हजार रुपये घेतले. परत नांदायला येते असे आमिष दाखवले.
त्यानंतर स्वाती नांदायला न आल्याने सिडनीने तिच्याकडे विचारणा केली. त्याने तिच्याकडे पैसे परत मागितले. तेव्हा ‘मी बलात्कार आणि छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करेल. तू आणखी पैसे पाठव’, अशी धमकी स्वातीने त्याला दिली. पत्नीचा छळ आणि तिच्या धमकीमुळे सिडनीने राहत्या घरात गळफास घेऊन नुकतीच आत्महत्या केली, असे स्टॅन्ली दोरायराज यांनी फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस उपनिरीक्षक पाटील पुढील तपास करत आहेत.