टेकड्यांवर सुरक्षा अन् गस्त वाढविणार; चंद्रकांत पाटील यांची वन विभागासोबत आढावा बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 09:58 IST2025-01-14T09:57:45+5:302025-01-14T09:58:33+5:30

टेकडीवर सायंकाळनंतर गस्त घालण्यासाठी मनुष्यबळाची सोय केली जाईल. अतिक्रमण करणाऱ्या बिल्डरांवर कडक कारवाई होईल

Security and patrolling will be increased on the hills; Chandrakant Patil holds review meeting with the Forest Department | टेकड्यांवर सुरक्षा अन् गस्त वाढविणार; चंद्रकांत पाटील यांची वन विभागासोबत आढावा बैठक

टेकड्यांवर सुरक्षा अन् गस्त वाढविणार; चंद्रकांत पाटील यांची वन विभागासोबत आढावा बैठक

पुणे : ‘टेकड्यांवरील वणवे, सायंकाळनंतर फिरणारी जोडपी, अतिक्रमण आदी विषयांवर कडक लक्ष ठेवण्यात येईल. त्यासाठी वन विभागाला सुरक्षारक्षक, सीसीटीव्ही, वॉच टॉवर या गोष्टी पुरविण्यासाठी प्रयत्न करू. यासाठी महापालिकेचीही मदत घेण्यात येईल. टेकडीवर सायंकाळनंतर गस्त घालण्यासाठी मनुष्यबळाची सोय केली जाईल. अतिक्रमण करणाऱ्या बिल्डरांवर कडक कारवाई होईल,’ असा इशारा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला.

वन विभागाच्या वन भवनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये ते बोलत होते. याप्रसंगी उपवनसंरक्षक महादेव मोहिते, विभागीय वन अधिकारी स्नेहल पाटील, सहायक वनसंरक्षक दीपक पवार, वन परिक्षेत्र अधिकारी मनोज बारबोले आदी उपस्थित होते. म्हातोबा टेकडीवर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त साडेसहा हजार झाडे लावली होती. परंतु, गेल्या काही दिवसांमध्ये तिथे आग लागली आणि तेथील अडीच हजार झाडे होरपळून निघाली. त्यामुळे पाटील चांगलेच संतापले. त्यांनी सोमवारी उपाययोजना करण्यासाठी बैठक घेतली.

बैठकीनंतर पाटील म्हणाले, ’’म्हातोबा टेकडीवर आगीच्या तीन घटना घडल्या. त्यात अडीच हजार झाडांचे नुकसान झाले. त्यामुळे टेकड्यांवर सीसीटीव्ही लावणे, सुरक्षा गार्ड नेमणे, चार वॉच टॉवर उभे करणे, गवत साचू न देणे, मशीनच्या साह्याने गवत काढणे आणि त्याची विल्हेवाट लावणे यावर वन विभागासोबत बैठक झाली आहे. त्यानुसार उपाययोजना करण्यात येतील.’’

पुण्यातील म्हातोबा टेकडीनिमित्ताने सगळ्या टेकड्यांचा प्रश्न समोर आला. सर्वच ठिकाणी सुरक्षारक्षक वाढवणे, त्यांना गाड्या देणे, त्याचे मॉनिटरिंग करणे आवश्यक आहे. सगळ्या टेकड्यांवर हा विषय करावा लागणार आहे. टेकड्यांवर गैरप्रकार होत असेल, तर त्याला सोडले जाणार नाही, असेही पाटील म्हणाले. 

टेकड्यांवरील सुरक्षेकडे योग्य ते लक्ष दिले जाईल. त्यासाठी हवे असलेले साहित्य, मनुष्यबळ पुरविण्यात येईल. पण, पुन्हा वणवे लागण्याचे प्रकार होऊ नयेत. तिथे सायंकाळनंतर किंवा दिवसा लुटण्याचे प्रकार होतात, ते होणार नाहीत. त्यासाठी गस्त वाढविण्यात येईल. सीसीटीव्ही कॅमेरे लावले जातील. गस्त असल्याने लोकांमध्ये भीती राहील. - चंद्रकांत पाटील, आमदार

 आमच्याकडे मनुष्यबळाची कमतरता आहे. पण, आता ८ गार्ड, गस्त घालण्यासाठी माणसं, सीसीटीव्ही कॅमेरे यासाठी तरतूद नाही. त्यासाठी महापालिकेची मदत किंवा सीएसआर फंड घेण्यात येईल. येत्या २३ जानेवारी रोजी महापालिकेसोबत आढावा बैठक होईल. -महादेव मोहिते, उपवनसंरक्षक 

Web Title: Security and patrolling will be increased on the hills; Chandrakant Patil holds review meeting with the Forest Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.