लष्कर (पुणे कॅम्प) : राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा देण्याची घोषणा विधानसभेत केली. याचे लष्कर भागात विविध मंडळांनी स्वागत केले, मात्र राज्य महोत्सव होताना मंडळात दिवसरात्र राबणारे कार्यकर्त्यांच्या भावना काय आहेत, हे विचारात घेऊन हा राज्य महोत्सव होईल, अशा भावना लष्कर भागातील गणेश मंडळ कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.
लष्कर भागातील गणेशोत्सवाला ऐतिहासिक ब्रिटिशकालीन परंपरा लाभली आहे. लष्कर भागातील जवळपास पाच मंडळे ही शंभरी पूर्ण करणारी आहेत. टिळकांनी स्वराज्यासाठी गणेशोत्सवाच्या माध्यमातून नागरिकांची एकत्रीकरण करण्यास सुरुवात करून खऱ्या अर्थाने ब्रिटिश राजवटीविरुद्ध विरोध पुकारला. त्यानंतर गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधनाचे कार्य सुरू झाले. आणि हा उत्सव देशभर पसरला. आता तर गणेशोत्सवाची ख्याती परदेशातही पसरली आहे, खऱ्या अर्थाने पुणेकरांच्या जिव्हाळ्याचा सण म्हणजे गणेशोत्सव, या काळात सर्व मंडळांचे कार्यकर्ते अहोरात्र झटतात, नाही गेलेली कुटुंब मूळ ठिकाणी परत येते, आपले गणेशोत्सव सगळ्यात चांगला व्हावा, यासाठी मंडळातील कार्यकर्ता अहोरात्र झटतो, त्यामुळे जर राज्य सरकार गणेशोत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा देत असेल तर हा उत्सव यशस्वी करणारे कार्यकर्ते यांचे अनुभव, त्यांची भावना, विचार शासनाने करावा, अशी मागणी लष्कर भागातील कार्यकर्ते ‘लोकमत’शी बोलताना केली आहे.
शाळांना दहा दिवस सुट्या द्याव्यात
गुजरात, राजस्थान, पश्चिम बंगाल ही राज्ये नवरात्र उत्सवात शाळांना सुट्या देतात. याच पार्श्वभूमीवर पुणे शहर हे गजबजलेले आहे. शहरातील मुख्य ठिकाणी चालणारा गणेशोत्सव हा वाड्या-वस्त्यांचा भाग असून शहरातील वाहतूक कोंडी समस्या लक्षात घेऊन पुणे शहरातील शाळांनादेखील उत्सव काळात सुट्या जाहीर करण्याची भावना लष्कर येथील कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
कार्यकर्त्यांचा विमा काढावा
गणेशोत्सवातील कार्यकर्ते हे महिनाभरापासून कामाला सुट्या करून गणेशोत्सवाची तयारी करीत असतात, ह्या धावपळीदरम्यान अनेक अपघातांची शक्यता असते, दहीहंडी सणादरम्यान ज्याप्रमाणे पथकाचा विमा उतरवला जातो, त्याप्रमाणे गणेशोत्सव कार्यकर्त्यांचा विमा उतरवला जावा, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली.
निदान मंडळाचा मंडपाचा खर्च शासनाने करावा
गणेशोत्सव साजरा करताना गणेश कार्यकर्ता हा अनेक वेळा कर्जबाजारी होऊनही पुढल्या वर्षी त्याच जोमाने काम करतो, मात्र त्यादरम्यान सर्वच कार्यकर्त्यांवर पैशांचा अतिरिक्त बोजा येतो, त्यामुळे जर राज्य सरकार गणेशोत्सव राज्य महोत्सव म्हणून साजरा करणार असेल तर निदान मंडळाचा मंडपाच्या खर्चाची जबाबदारी राज्य सरकारने उचलावी.
तेव्हा खऱ्या अर्थाने हा उत्सव राज्य महोत्सव
लष्कर भागाला ऐतिहासिक गणेश मंडळाची परंपरा लाभली असून, लष्कर म्हणजे ब्रिटिश छावणी होत येथेच टिळकांनी येथील अनेक गणेश मंडळांची स्थापना केली आहे. अनेक मंडळे शंभरी पार केलेली आहेत. उत्सवात मंडळाचे कार्यकर्ते हे महत्त्वाचे आहेत, त्यामुळे शासनाने कार्यकर्त्यांच्या भावना ऐकून घ्याव्यात. तेव्हा खऱ्या अर्थाने हा उत्सव राज्य महोत्सव होईल.