पुणे : विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसचालकाने शाळकरी मुलीशी अश्लील कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी चालकाला कोंढवापोलिसांनी अटक केली.
कय्यूम अहमद पठाण (वय ३३, रा. विद्यानगर, कोंढवा खुर्द) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका १५ वर्षीय मुलीने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी एका शाळेमध्ये शिकत आहे. आरोपी पठाण शाळकरी मुलांची मिनी बसमधून ने-आण करतो. बसमध्ये लहान मुले असतात. ती बसमधील मागील आसनावर बसायची. ११ डिसेंबर रोजी मुलगी शाळेतून निघाली. कात्रज - कोंढवा रस्त्यावर आरोपीने एका मुलाला सोडण्यासाठी बस थांबवली. मुलीने मुलाला खाली उतरवले. ती बसच्या दरवाजाजवळ थांबली होती. त्यावेळी आरोपीने तिच्याशी अश्लील कृत्य केले.
त्यानंतर घाबरलेली मुलगी बसमधील मागील आसनावर जाऊन बसली. मुलीने या प्रकाराची माहिती कुटुंबीयांना दिली नव्हती. दोन दिवसांपूर्वी आरोपी पठाणने पुन्हा अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केला. अखेर घाबरलेल्या मुलीने या घटनेची माहिती कुटुंबीयांना दिली. कोंढवा पोलिसांनी पठाणला अटक केली असून, त्याच्यावर पाेक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक पूजा पाटील करीत आहेत.
कर्मचाऱ्याकडून पालकाला अश्लील संदेश पाठवत विनयभंग
हडपसर भागातील एका शाळेतील कर्मचाऱ्याने महिला पालकाला अश्लील संदेश पाठवून तिचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली. याबाबत एका महिलेने फिर्याद दिली. याप्रकरणी कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेची दोन मुले त्या शाळेत शिकतात. आरोपीने महिलेचा मोबाइल क्रमांक घेतला. मुलांना काही अडचण आल्यास तुम्हाला कळवत जाईन, असे त्याने सांगितले होते. त्यानंतर २३ डिसेंबर रोजी त्याने महिलेला अश्लील संदेश पाठवून तिचा विनयभंग केला. आरोपीने महिलेचा पाठलाग केला, असेही फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अल्ताफ शेख करीत आहेत.