सावित्रीबाई फुले पुणे  विद्यापीठाचे लडाखला संशोधन केंद्र

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2019 12:14 PM2019-11-04T12:14:31+5:302019-11-04T12:15:34+5:30

लडाख येथे संशोधन केंद्र सुरू करण्यासाठी विद्यापीठाला पाचारण करण्यात आले आहे.

Savitribai Phule Pune University's Research Center in Ladakh | सावित्रीबाई फुले पुणे  विद्यापीठाचे लडाखला संशोधन केंद्र

सावित्रीबाई फुले पुणे  विद्यापीठाचे लडाखला संशोधन केंद्र

googlenewsNext
ठळक मुद्देखासदारांचे विद्यापीठाला पत्र : जमीन, सोयी -सुविधा, मनुष्यबळाविषयी मागविली माहिती

पुणे : ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट असा नावलौकिक असलेल्या सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठाने जम्मू-काश्मीरमध्ये संशोधन केंद्र सुरू करावे, यासाठी गेल्या काही दिवसांपासून हालचाली सुरू आहेत. त्यास आता गती मिळाली असून, पुढील काही दिवसांत विद्यापीठाचा अभ्यास गट लडाख येथे भेट देण्यासाठी जाणार आहे. त्यानंतर कोणत्या क्षेत्रात लडाख येथे संशोधन केंद्र सुरू करावे, याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे विद्यापीठाच्या अधिकाºयांनी सांगितले.
जम्मू-काश्मिरचे ३७० कलम रद्द केल्यानंतर या ठिकाणी शैक्षणिक संस्था व उद्योग सुरू करण्याची संधी उपलब्ध झाली.

पुण्यातील शैक्षणिक संस्थांनी जम्मू-काश्मीर येथे शैक्षणिक काम सुरू करण्याबाबत तयारी दर्शविली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीमध्येही याबाबत ठराव करण्यात आला. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनीसुद्धा लडाख येथील काही शैक्षणिक संस्थांना भेट दिली आहे. त्यावर तेथील संस्थांनी विद्यापीठाच्या सहकार्याने संशोधन क्षेत्रात काम करण्याबाबत पुढाकार घेतला आहे. लडाखचे खासदार जामयांग शेरिंग नामग्याल यांनी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. करमळकर यांना नुकतेच याबाबत पत्र पाठविले आहे. तसेच, येत्या १५ नोव्हेंबरपूर्वी लडाख येथे भेट द्यावी, असे या पत्रात नमूद केले आहे.
लडाख येथील हिमनग, भूशास्त्र, नैसर्गिक  साधनसंपत्ती, कृषी व जैविक शेती आणि औषधी वनस्पती यांसह इतर क्षेत्रांत संशोधन करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला पाचारण करण्यात आले आहे. त्यासाठी विद्यापीठाला आवश्यक असणारी जमीन, सोई-सुविधा, साधनसामग्री, आवश्यक  मनुष्यबळ आदीबाबतची माहिती विद्यापीठाकडून मागविण्यात आली आहे. त्यावर स्थानिक स्टेकहोलर्ड (भागधारक) आणि आर्थिक गुंतवणूकदारांची पहिली बैठक घेतली जाणार आहे. त्यामुळे लडाख येथे विद्यापीठाचे संशोधन केंद्र सुरू होण्यास आता गती मिळाली आहे.
..............
औषधी वनस्पतींच्या क्षेत्रात केले जाणार काम 
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर म्हणाले, की लडाख येथे संशोधन केंद्र सुरू करण्यासाठी विद्यापीठाने एक अभ्यास गट तयार केला आहे. या गटाचे काम पूर्ण होत आले असून, पुढील दोन ते तीन दिवसांत तेथील शैक्षणिक संस्थांना व खासदार नामग्याल यांना आवश्यक माहिती पाठविली जाणार आहे. त्याचप्रमाणे विद्यापीठाच्या सायन्स पार्कच्या माध्यमातून जम्मू-काश्मीरच्या विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लागावी, यासाठी तेथील शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाईल. तसेच, विद्यापीठाच्या संबंधित विभागाकडून येथे 
औषधी वनस्पतींच्या क्षेत्रात काम केले जाईल 
.............
लडाख येथे संशोधन केंद्र सुरू करण्यासाठी विद्यापीठाला पाचारण करण्यात आले आहे. तसेच, काही विशिष्ट क्षेत्रात संशोधन करता येईल, असे सुचवले आहे. मात्र, लडाख येथील चुमातांग आणि पुगा येथे गरम पाण्याचे झरे आहेत. त्यामुळे येथे सुरुवातीला ५० ते १०० के. व्ही.चा ऊर्जा प्रकल्प उभारता येईल. त्यानंतर पुढील काळात त्याचा विस्तारही करता येऊ शकतो. हवा, पाणी अशा नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर करून ऊर्जानिर्मिती करण्यावर विद्यापीठाचा भर असेल. त्यासाठी, काही वर्षांपासून विद्यापीठ प्रयत्न करीत आहे.- डॉ. नितीन करमळकर, 
कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

Web Title: Savitribai Phule Pune University's Research Center in Ladakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.