Savitribai Phule Pune University steps to increase Marathi percentage in UPSC | यू.पी.एस.सीमध्ये मराठीचा टक्का वाढविण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे पाऊल
यू.पी.एस.सीमध्ये मराठीचा टक्का वाढविण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे पाऊल

पुणे  : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या स्पर्धा परीक्षा केंद्रातर्फे (सीईसी) या वर्षीपासून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांसाठी तीन वर्षांचा विशेष प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या संलग्न महाविद्यालयांमध्ये पदवीच्या दुसऱ्या वर्षात शिकणारे विद्यार्थी त्यासाठी प्रवेश घेऊन शकणार आहेत. विद्यार्थ्यांची या स्पर्धांसाठी कमी वयात तयारी व्हावी आणि जास्तीत जास्त मराठी विद्यार्थी या परीक्षांद्वारे केंद्र सरकारच्या उच्च पदांवर पोहोचावेत, या उद्देशाने हा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे.

विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. (डॉ.) नितीन करमळकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या वेळी कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक आणि निवृत्त आयपीएस अधिकारी प्रा. जयंत उमराणीकर उपस्थित होते. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या पदांमध्ये मराठी विद्यार्थ्यांना अधिक प्रतिनिधित्व मिळावे तसेच, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, हा उद्देश या अभ्यासक्रमामागे आहे, असे डॉ. करमळकर यांनी सांगितले.

प्रा. उमराणीकर यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली. हा अभ्यासक्रम तीन वर्षांचा असेल. विद्यार्थी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांना बसण्यास पात्र होईपर्यंत त्यांची या परीक्षेची तयारी पूर्ण झालेली असावी असा विचार करून या अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली आहे. विद्यार्थी पदवीचे शिक्षण घेत असतानाच त्यांच्यासाठी दररोज सायंकाळी दोन-अडीच तासांचे हे प्रशिक्षण असेल. त्यांच्यासाठी प्रख्यात शिक्षकांच्या व्याख्यानांबरोबरच परीक्षांसाठी आवश्यक असलेले उत्तरे लिहण्याचे कौशल्य, निबंध लेखन, इंग्रजीची उत्तम जाण, मुलाखतीचे तंत्र, तज्ज्ञ व यशस्वी व्यक्तींशी संवाद तसेच, अधिकारी बनण्यासाठी आणि नंतर अधिकारी म्हणून वापरताना आवश्यक असलेला व्यक्तिमत्व विकास या गोष्टींचे विशेष मार्गदर्शनही दिले जाणार आहे, असे प्रा. उमराणीकर यांनी सांगितले.

या अभ्यासक्रमाचे हे पहिलेच वर्ष आहे. पहिल्या वर्षीत ४० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. प्रवेशासाठी बारावीच्या परीक्षेत मिळालेले गुण ग्राह्य धरले जाणार आहेत. या अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी ७ ऑक्टोबर २०१९ पर्यंत अर्ज करता येणार आहेत, असेही प्रा. उमराणीकर यांनी सांगितले. याबाबतची सविस्तर माहिती व अर्ज http://unipune.ac.in/cec/default.htm या लिंकवर उपलब्ध आहेत. तीन वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी दरवर्षी ४० हजार रुपये इतके शुल्क आकारले जाणार आहेत.

Web Title: Savitribai Phule Pune University steps to increase Marathi percentage in UPSC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.