बारामतीत सत्तारांच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद; गाढवाला छायाचित्रे लावून राष्ट्रवादीची निदर्शने
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2022 14:54 IST2022-11-08T14:54:17+5:302022-11-08T14:54:33+5:30
अब्दुल सत्तार मुर्दाबाद, पन्नास खोके एकदम ओकेचे फलक या ठीकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या

बारामतीत सत्तारांच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद; गाढवाला छायाचित्रे लावून राष्ट्रवादीची निदर्शने
बारामती : शिंदे गटाचे नेते व कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे बारामतीत तीव्र पडसाद उमटले. मंगळवारी(दि ८) सकाळी आक्रमक राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. यावेळी गाढवाच्या गळ्यात सत्तारांचे छायाचित्रे लावून राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी निदर्शने केली.
अब्दुल सत्तार मुर्दाबाद, पन्नास खोके एकदम ओकेचे फलक या ठीकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या. शहरातील भिगवन चौक येथे राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी एकत्रित आले होते. सत्तार यांचा तीव्र निषेध नोंदवत जोरदार निदर्शने केली. यावेळी सत्तार यांच्या विरोधात नीम का पत्ता कडवा है, पन्नास खोके एकदम ओके, अशा घोषणा यावेळी करण्यात आल्या.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर म्हणाले, अनेक पक्ष बदलुन अब्दुल सत्तार त्या गटात सामील झाले आहेत. नीतीभ्रष्ट आणि असंवेदनशील मंत्र्याचा आम्ही निषेध करतो. मंत्रीमंडळातून हि घाण बाजुला करा, अशी सरकारकडे आमची मागणी असल्याचे होळकर म्हणाले.
बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष जय पाटील म्हणाले, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सुसंस्कृत राजकारणाची परंपरा संपुर्ण महाराष्ट्राला दिली. मात्र, याच राज्यात शिंदे - फडवणीस सरकारमधील मंत्र्यांनी महिलांबाबत बेजबाबदारपणे वक्तव्य केले आहे. अशा मंत्र्यांना कृषिमंत्री पद देऊन सरकारने संपुर्ण बळीराजाचा अपमान केला आहे. त्यामुळे सत्तार यांचा तीव्र शब्दात निषेध करतो. अब्दुल सत्तार यांनी केवळ माफी मागुन चालणार नाही. तर सत्तार यांचा मंत्रीपदाचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना करीत असल्याचे पाटील यांनी सांगितले.