पुणे : सतीश वाघ अपहरण व खून प्रकरणातील अटक आरोपी अतिश संतोष जाधव याने साथीदार पवन शर्मा, नवनाथ गुरसाळे, विकास शिंदे या तिघांसोबत मिळून हा गुन्हा केला. त्यासाठी आरोपी अक्षय जावळकर याने सुपारी दिल्याची कबुली चौकशीत दिल्याचे पोलिसांनीन्यायालयात सांगितले.
आरोपी अतिशला लष्कर न्यायालयाने ३० डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. सतीश वाघ यांचा खून केल्यानंतर पसार झालेल्या आरोपी अतिशला धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील इंदिरानगर येथून पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. आरोपी अतिश विरोधात हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपीचा मोबाइल पोलिसांनी जप्त केला आहे.आरोपीने गुन्हा करण्यासाठी वापरलेले हत्यार जप्त करायचे आहे. तसेच आरोपीला सुपारी स्वरूपात मिळालेली रक्कम हस्तगत करायची आहे व त्याची वैद्यकीय तपासणी करायची आहे. आरोपीने हा गुन्हा कोणाच्या सांगण्यावरून केला, त्यामागचा मुख्य सूत्रधार कोण आहे, त्याचे आणखी कोणी साथीदार आहेत का, फरार असताना त्याला कोणी आश्रय दिला, याचा तपास करायचा आहे. तसेच आरोपीची अटकेत असलेल्या साथीदारांसोबत एकत्रित चौकशी करायची आहे. त्यासाठी आरोपीला पोलिस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील डॉ. आम्रपाली कस्तुरे यांनी केली. न्यायालयाने ती मान्य केली.