The Sassoon administration insisted on not providing meals to doctors, nurses and other staff | डॉक्टर, परिचारिका व अन्य कर्मचाऱ्यांना जेवण न पुरविण्यावर ससून प्रशासन ठाम

डॉक्टर, परिचारिका व अन्य कर्मचाऱ्यांना जेवण न पुरविण्यावर ससून प्रशासन ठाम

ठळक मुद्देप्रशासनाच्या निर्णयाविषयी काही डॉक्टरांनी व्यक्त केली नाराजी

पुणे : कोरोनाबाधित रुग्णांची सेवा करणारे डॉक्टर, परिचारिका व अन्य कर्मचाऱ्यांना शासकीय निवासस्थानी व्यवस्था करणे व जेवण न पुरविण्यावर ससून रुग्णालय प्रशासन ठाम आहे. याठिकाणी कॅन्टीनची व्यवस्था असून तिथून त्यांना जेवण उपलब्ध होऊ शकते. तसेच आता अ‍नलॉकमध्ये हॉटेलसह सर्व सुविधा उपलब्ध होत आहेत. त्यामुळे त्यांना अडचणी येणार नाहीत, असे ससून रुग्णालय प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
कोविड रुग्णालयांत काम करणाऱ्या सुमारे २५० ते ३०० डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांच्या राहणे व जेवणाची व्यवस्था हॉटेलमध्ये केली जात होती. पण या हॉटेलांची बिले देण्यास पैसे नसल्याने त्यांची व्यवस्था करणे यापुढे शक्य नसल्याचे जिल्हा प्रशासनाने रुग्णालयाला कळविले आहे. त्यानुसार रुग्णालयाकडून १ ऑक्टोबरला याबाबतचे परिपत्रक काढून सर्वांची व्यवस्था शासकीय निवासस्थानांमध्ये केली जाणार असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांच्या जेवणाची व्यवस्था त्यांनीच करावी, असेही त्यात नमुद करण्यात आले आहे.
याविषयीची भुमिका स्पष्ट करताना रुग्णालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे म्हणाले, सुरूवातीच्या काळात लॉकडाऊनमुळे सर्व ठप्प होते. तसेच कोरोनाविषयी पुरेशी माहिती नसल्याने डॉक्टर, परिचारिकांची व्यवस्था हॉटेलमध्ये करण्यात आली. मात्र, सध्या राज्यात कुठेही अशी व्यवस्था नाही. जिल्हा प्रशासनानेही बिल देणे शक्य नसल्याचे कळविले आहे. ससून रुग्णालयालाही तेवढा खर्च झेपणारा नाही. त्यामुळे शासकीय निवासस्थानांमध्ये व्यवस्था केली आहे. याठिकाणी कॅन्टीन आहेत. सर्व हॉटेलही सुरू होत आहेत. त्यामुळे त्यांना जेवणाची काही अडचण येणार नाही’, असे त्यांनी स्पष्ट केले.
----------------
कोविड मानधनचे आश्वासन
मागील महिन्यात वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी राज्यातील परिचारिका संघटनेच्या प्रतिनिधींसी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली होती. त्यामध्ये त्यांनी याबाबत पुर्वकल्पना दिली होती. तसेच कोविड मानधन देण्याचे आश्वासनही दिले होते. पण अद्याप यावर निर्णय झालेला नसतानाच रुग्णालयाने हा निर्णय घेतला. जेवणाची व्यवस्था करणे कठीण जाणार आहे. त्यामुळे किमान रात्रीच्यावेळी जेवणाची व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
- प्रज्ञा गायकवाड, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशन, ससुन रुग्णालय
---------------
प्रशासनाच्या निर्णयाविषयी काही डॉक्टरांनी नाराजी व्यक्त केली तर काही डॉक्टरांनी याबाबत प्रशासनाच्या भुमिकेशी सहमती दर्शविली आहे. मागील सहा महिन्यांपासून हॉटेलमध्ये व्यवस्था होती. आता विषाणुमुळे होणाऱ्या संसर्गाबाबत खुप जनजागृती झाली आहे. अनलॉकमुळे सर्व सुविधाही उपलब्ध होत आहेत. त्यामुळे फारशी अडचण येणार नाही, असे एका डॉक्टरांनी सांगितले. तर शासकीय निवासस्थानांमध्ये राहणे ठीक असले तरी नाश्ता व जेवणासाठी धावपळ करावी लागेल. त्याची व्यवस्था तरी रुग्णालयाने करावी, असे अन्य डॉक्टरांचे म्हणणे आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: The Sassoon administration insisted on not providing meals to doctors, nurses and other staff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.