पुणे : शहरातील उच्चभ्रू परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोरेगाव पार्कमध्ये कार्यालयातील घरफोडीत पसार झालेल्या सराईताला गुन्हे शाखेच्या युनीट दोनने नाशिकमधूनअटक केली. त्याच्याविरोधात तब्बल ५० हून अधिक गुन्हे दाखल आहेत. रामनिवास मंजू गुप्ता (३७ रा. महू, मध्यप्रदेश, विठ्ठलवाडी ठाणे ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. ३ जुलै २०२५ रोजी त्याने पृथ्वी एक्सचेंज इंडिया लिमिटेडचे कार्यालय फोडले होते.
कोरेगाव पार्क पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पृथ्वी एक्सचेंज इंडीया लिमिटेड कार्यालयात ३ जुलैला चोरी झाली होती. संबंधित ठिकाणी चान्सपिंन्ट वरून फिंगरप्रिंट विभागाला आरोपी रामनिवास मंजू गुप्ता असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेच्या युनीट दोनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अंजूम बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीचा शोध घेण्यात येत होता. पथकातील सहायक पोलिस निरीक्षक अमोल रसाळ यांना संबंधित आरोपी नाशिकमध्ये येणार असल्याची माहिती मिळाली.
आरोपी सराईत असल्यामुळे पथकाने विशेष खबरदारी घेत नाशिक गाठले. त्याठिकाणी स्थानिक पोलिसांच्या मदतीने सापळा रचून सराईत रामनिवास गुप्ता याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने कोरेगाव पार्क व येरवडा हद्दीत घरफोडी केल्याचे दोन गुन्हे कबूल केले. ही कामगिरी गुन्हे शाखेचे अपर पोलिस आयुक्त पंकज देशमुख, एसीपी राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक अंजूम बागवान, एपीआय अमोल रसाळ, अंमलदार ओम कुंभार, आबनावे, सोनम नेवसे, शिंदे, भिलारे, चव्हाण, सरडे, ताम्हाणे, जाधव, मोकाशी, पवार, टकले, निखिल जाधव, संजय आबनावे आणि विनायक वगारे यांनी केली.