संजय राऊतांचा हजारेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून स्वार्थ साधण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:03 IST2021-02-05T05:03:21+5:302021-02-05T05:03:21+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पिंपरी : अण्णा हजारे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दाला मान देत त्यांच्यावर विश्वास ठेवून केंद्र सरकारविरोधातील ...

Sanjay Raut's selfish attempt to put a gun on Hazare's shoulder | संजय राऊतांचा हजारेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून स्वार्थ साधण्याचा प्रयत्न

संजय राऊतांचा हजारेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून स्वार्थ साधण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्क

पिंपरी : अण्णा हजारे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दाला मान देत त्यांच्यावर विश्वास ठेवून केंद्र सरकारविरोधातील आंदोलन स्थगित केले. असे असताना शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पोटात दुखले नाही तर कसे चालेल, असा प्रश्न उपस्थित करून प्रवीण दरेकर यांनी राऊत यांच्यावर तोफ डागली आहे.

दरेकर यांनी सोमवारी पिंपरी-चिंचवड शहराला भेट दिली. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी राऊत यांच्यावर टीका केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अण्णा हजारे यांनी केंद्र सरकारविरोधात आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यामुळे भाजप नेत्यांकडून त्यांची मनधरणी सुरू होती. त्यानुसार देवेंद्र फडणवीस यांनी अण्णा हजारे यांची भेट घेतली. हजारे यांनी आंदोलन स्थगित केले. त्यानंतर ‘सामना’तून अण्णा यांच्या या भूमिकेवर तिरकस भाष्य करण्यात आले.

‘संभाजीनगर’बाबत कृती करावी

शिवसेनेच्या करणी आणि कथणीत फरक आहे. संभाजीनगरच्या बाबतीत आम्ही तडजोड करणार नाही, असे सांगतात. मग महापालिकेत त्यांची सत्ता आहे. त्यामुळे त्यांनी महापालिकेत ठराव करावा कॅबिनेटचा निर्णय घ्या, केंद्र सरकारच्या मदतीची आवश्यकता लागल्यास आम्ही पुढाकार घेऊ. केवळ जाहीर करणे, घोषणा करणे यापेक्षा कृतीची आवश्यकता आहे, असे दरेकर म्हणाले.

तात्याराव लहाने यांनी चार भिंतीत बोलावे

भाजप सरकारच्या काळात त्रास झाला, असे वक्तव्य डाॅ. तात्याराव लहाने यांनी केले. त्याबाबत दरेकर म्हणाले, त्यांच्यासारख्या अधिकाऱ्यांकडून अशा प्रकारच्या वक्तव्याची अपेक्षा नव्हती. राजकारणात सत्ताधारी किंवा विरोधक जाहीररीत्या एकमेकांची उणीदुणी काढतात, त्याप्रमाणे प्रशासनातील, सरकारमधील उणीदुणी बाहेर काढणे शोभा देणारे नाही. अशा प्रकारचे वक्तव्य करणे योग्य नाही. लहाने यांनी चार भिंतींच्या आत बोलायला पाहिजे. लहाने यांना पद्मश्री पुरस्कार मिळावा, यासाठी फडणवीस यांनी पुढाकार घेतला आहे.

विरोधकांना कावीळ झाली आहे

दृष्टी तशी सृष्टी दिसते. विरोधी पक्षाच्या नजरेला कावीळ झाली असून, त्यांना सगळंच पिवळं दिसत आहे. प्रत्येक गोष्ट राजकीय दृष्टिकोनातून बघितली जात आहे. त्यामुळे अर्थसंकल्पावर त्यांच्याकडून राजकीय अभिनिवेशातून टीका होत आहे. कोरोनाच्या संकटकाळानंतर सर्व घटकांना सामावून घेणारा व देशवासीयांचा आत्मविश्वास वाढविणारा हा केंद्रीय अर्थसंकल्प आहे. प्राधान्यक्रम नजरेसमोर ठेवून अर्थव्यवस्था सुरळीत करण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पातून केला आहे.

- प्रवीण दरेकर, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते

Web Title: Sanjay Raut's selfish attempt to put a gun on Hazare's shoulder