काँग्रेसच्या पॉलिसीमुळेच चहावाला देशाचा पंतप्रधान : संजय जगताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 04:02 PM2017-10-26T16:02:06+5:302017-10-26T19:49:03+5:30

गेल्या ६० वर्षात काँग्रेसने केलेल्या विकासकामामुळे एक चहवाला देशाच्या पंतप्रधान झाला आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनी केले.

Sanjay Jagtap on Congress policy | काँग्रेसच्या पॉलिसीमुळेच चहावाला देशाचा पंतप्रधान : संजय जगताप

काँग्रेसच्या पॉलिसीमुळेच चहावाला देशाचा पंतप्रधान : संजय जगताप

Next
ठळक मुद्देइंदिरा गांधी जन्मशताब्दी पंधरवड्यानिमित्त १ ते १७ नोव्हेंबर २०१७ या कालावधीत काँग्रेसच्या वतीने विविध उपक्रमजिल्ह्यातील तेरा तालुक्यात महाविद्यालयीन पातळीवर खुल्या गटात होणार वक्तृत्व स्पर्धा

पुणे : काँग्रेस हा पक्ष नाही, तर पॉलिसी आहे. देशातील सर्वसामान्य माणसाचा विकास काँग्रेसने केला आहे आणि यापुढेही करत राहील. गेल्या तीन वर्षात सत्ताधारी पक्षाला कोणतीही ठोस कामे करता आली नाही. त्यामुळे नुसत्या घोषणाबाजीत ते मश्गूल आहेत. गेल्या ६० वर्षात काँग्रेसने केलेल्या विकासकामामुळे एक चहवाला देशाच्या पंतप्रधान झाला आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनी केले.
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त पंधरवडा कार्यक्रमाच्या नियोजनानिमित्त काँग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी माजी खासदार विदुरा नवले, उपाध्यक्ष संग्राम मोहोळ, खजिनदार महेशबापू ढमढेरे, नंदुकाका जगताप, पृथ्वीराज पाटील, स्वप्निल सावंत, सोमनाथ दौंडकर, सत्यशील शेरकर, कौस्तुभ गुजर, सीमा सावंत आणि विजय जाधव उपस्थित होते. 
पुणे जिल्ह्यात इंदिरा गांधी जन्मशताब्दी पंधरवड्यानिमित्त १ ते १७ नोव्हेंबर २०१७ या कालावधीत जिल्हा काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. इंदिरा गांधी यांच्या जिवनावर आधारित नव्या पिढीला माहिती होण्याच्या दृष्टीने वक्तृत्व स्पर्धा,  जीवनपट सांगणारी भाषणे, इंदिरा गांधी यांची कार्यकीर्द, धोरण या विषयाबाबत जागृती करण्याच्या दृष्टीने ‘इंदिरा’ रथ जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील गावागावात जाऊन जनजागृती करणार आहे.
तसेच जिल्ह्यातील तेरा तालुक्यात महाविद्यालयीन पातळीवर खुल्या गटात वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये विजयी उमेदवारांना प्रथम तीन क्रमांकानुसार ५ हजार, ३ हजार आणि २ हजार रूपयांचे तसेच उत्तेजनार्थ प्रत्येकी पाच जणांना १ हजार रूपयांचे पारितोषीक, सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी किमान ३० स्पर्धक असावेत अशी अट असणार आहे. प्रत्येक तालुक्यातील ५ स्पर्धक असे तेरा तालुक्यातील एकूण ६५ स्पर्धकांची वरील विषयावर जिल्हा पातळीवर पुणे येथे स्पर्धा होणार आहे. त्यातील १० विजयी स्पर्धकांना अनुक्रमे १० हजार, ७ हजार आणि ५ हजार तसेच ७ जणांना उत्तेजनार्थ प्रत्येकी ३ हजार रूपयांचे रोख पारितोषिक आणि सन्मानचिन्हा देण्यात येणार आहे. ही स्पर्धा सर्वांना खुली असणार आहे. पंधरवडा कार्यक्रमाचा समारोप पुणे येथील गणेश कला क्रीडा मंच येथे काँग्रेसच प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत होणार आहे. 
संजय जगताप म्हणाले, की काँग्रेसने नेहमी सर्वसामान्य माणसाला त्याच्यातले गुण हेरून देशाचे नेतृत्व करण्याची संधी दिली आहे. त्यामुळेच इंदिरा गांधी, राजीव गांधी, पी. व्ही. नरसिंहराव, डॉ. मनमोहन सिंग अशा दमदार नेतृत्वामुळे आज देश प्रगतीच्या वाटेवर आहे. काँग्रेस पक्षाने राबविलेल्या विविध पॉलिसीमुळे आजची आपली वाटचाल सुकर झाली आहे. 

Web Title: Sanjay Jagtap on Congress policy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.