अहमदाबाद - गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. दरम्यान उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी काँग्रेसवर टीका करताना वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. काँग्रेसवर उपहासात्मक टीका करण्याच्या नादात नितीन पटेल यांची जीभ घसरली. 'गुजरातमध्ये सरकार बनवण्यासाठी हाफिज सईदसारख्या दहशतवाद्यांची मदत मिळणार असेल तर काँग्रेस त्यांनाही निमंत्रण पाठवेल', असं नितीन पटेल बोलले आहेत. नितीन पटेल यांच्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला असून, विरोधक मोठ्या प्रमाणात टीका करत आहेत. 


पाटीदार समाजाला आरक्षण मिळण्यासाठी छेडण्यात आलेल्या आंदोलनात सहभाग असणारे दोन मुख्य नेते रेशमा आणि वरुण पटेल यांनी भाजपात प्रवेश केल्याच्या पार्श्वभुमीवर नितीन पटेल बोलत होते. आणि वरुण पटेल यांनी हार्दिक पटेलची साथ सोडत भाजपात प्रवेश केला. भाजपाध्यक्ष अमित शहा यांचा हा मास्टरस्ट्रोक असल्याचं बोललं जात आहे. 

रेशमा आणि वरुण पटेल यांनी पत्रकार परिषदेदरम्यान हार्दिक पटेलवर फसवल्याचा आरोप केला. पत्रकार परिषद सुरु असताना हार्दिक पटेलचे समर्थक घटनास्थळी पोहोचले, आणि दोघांना विरोध करण्यास सुरुवात केली होती. 

राज्यातील 15 टक्के जनता पटेल असल्याने प्रत्येक पक्ष मतं मिळवण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करत आहेत. 80 जागांचा निकाल पटेल समाजाच्या मतांवर निर्भर असणार आहे. भाजपाच्या 182 आमदारांपैकी, 44 आमदार पटेल समाजाचे आहेत. सरकारकडून आरक्षण मिळत नसल्याने, पटेल समाजातील लोक नाराज आहेत. पटेल समाज नाराज होऊ नये यासाठी सरकारकडून पुरेपूर प्रयत्न सुरु आहेत, मात्र आरक्षण देणं शक्य होत नाहीये. 

दरम्यान काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल यांच्यात अहमदाबादमधील एका हॉटेलमध्ये गुप्त बैठक झाल्याचे वृत्त समोर आले आहे. मात्र दोन्ही पक्षांकडून या बैठकीच्या वृत्ताचे खंडन करण्यात येत आहे. हार्दिक पटेलनंही हे वृत्त फेटाळून लावले आहे. यावर हार्दिकनं असे म्हटले आहे की, ''जर राहुल गांधींसोबत हातमिळवणी करायची असल्यास त्यांची सर्वांसमोर भेट घेईन. राहुल गांधींची लपून-छपून का भेट घेऊ ?''. तर दुसरीकडे, यापूर्वी असे वृत्त समोर आले होते की, सोमवारी ( 23 ऑक्टोबर ) सकाळी राहुल गांधी गांधीनगरमध्ये सभा घेण्यापूर्वी हार्दिक पटेलची भेट घेणार आहेत.  


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.