प्रवाशांशी उद्धट बोलणे, मनमानी भाडे मागणे; रिक्षाचालकांना चांगलाच धडा, आरटीओची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 18:31 IST2025-04-25T18:30:52+5:302025-04-25T18:31:49+5:30
प्रवाशांना उद्धट बोलणे, जास्त भाडे घेणे, जवळचे भाडे नाकारणे अशा गोष्टी केल्यास कडक कारवाई करण्यात येईल, आरटीओचा इशारा

प्रवाशांशी उद्धट बोलणे, मनमानी भाडे मागणे; रिक्षाचालकांना चांगलाच धडा, आरटीओची कारवाई
पुणे: पुणे प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) रिक्षा चालकांच्या विरोधात तक्रारीसाठी दिलेल्या क्रमांकावर नागरिकांनी रिक्षा चालकांविरोधात २५२ तक्रारी केल्या आहेत. या रिक्षाचालकांपैकी ५० जणांवर दंडात्मक कारवाई केली आहे. तर, ५० जणांचा वाहन चालविण्याचा परवाना काही दिवसांसाठी रद्द केले आहे. त्यामध्ये सर्वाधिक भाडे नाकारल्याच्या तक्रारी आल्या आहेत. यामुळे रिक्षाचालकांमध्ये सुधारणा होणार की नाही, असा प्रश्न प्रवासी विचारत आहेत.
गेल्या वर्षी जून महिन्यात पुणे प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) रिक्षा, कॅब आणि खासगी ट्रॅव्हल्स यांच्याविरोधात तक्रार करण्यासाठी ८२७५३३०१०१ हा व्हॉट्स ॲप क्रमांक सुरू केला आहे. त्यामध्ये सर्वाधिक भाडे नाकारल्याच्या तक्रारी आल्या आहेत. या तक्रारीवर आरटीओकडून १०० रिक्षाचालकांवर कडक कारवाई करण्यात आली आहे. तरीही रिक्षा चालकांमध्ये काही सुधारणा होताना दिसत नाही. तर, इतरांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. रिक्षा चालकांकडून मीटरपेक्षा जास्त भाडे घेणे, उद्धटपणे वर्तन करणे, जवळचे भाडे नाकारणे, प्रवाशांशी वादावादी करणे अशा तक्रारी वाढल्या होत्या. परंतु यांच्याविरोधात तक्रार करण्यासाठी नागरिक ई-मेल व प्रत्यक्ष आरटीओमध्ये येऊन तक्रार करण्यास टाळाटाळ करत होते. त्यामुळे तक्रार करण्यासाठी एक हेल्पलाइन क्रमांक सुरू करण्याची मागणी केली जात होती. त्यानुसार जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हा क्रमांक सुरू करण्यात आला होता.
सुधारणा होणार की नाही
नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर आरटीओकडून रिक्षाचालकांवर कारवाई सुरू केली आहे. तरीही रिक्षा चालकांकडून अद्यापही जवळचे भाडे नाकरणे, मीटरप्रमाणे पैसे न घेता मनमानी पद्धतीने पैसे मागणे, प्रवाशांसोबत उद्धट वर्तन असे प्रकार सर्रास घडत आहेत. सर्व नागरिक तक्रार करत नाहीत. त्यामुळे रिक्षा चालकांचे फावत आहे.
अशी आहे ऑनलाइन तक्रारींची आकडेवारी
भाडे नाकारणे - ८८
मीटरपेक्षा जास्त भाडे - ७५
उद्धट वर्तन - ६१
पैशाची मागणी - १३
मीटर फास्ट - १५
रिक्षाचालकांकडून प्रवाशांना सुरक्षित आणि चांगली वागणूक देण्यात यावी. प्रवाशांना उद्धट बोलणे, जास्त भाडे घेणे, जवळचे भाडे नाकारणे अशा गोष्टी करू नये. प्रवाशांनी जर तक्रार केली तर त्यांच्या कडक कारवाई करण्यात येईल. - स्वप्निल भोसले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे