अंतिम वर्षाच्या परीक्षेवर शिक्षण क्षेत्रातील प्रमुख घटक मांडणार भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2020 07:46 PM2020-06-03T19:46:00+5:302020-06-03T19:50:02+5:30

राज्यातील लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला

The role of education sector people about final year exams will be soon | अंतिम वर्षाच्या परीक्षेवर शिक्षण क्षेत्रातील प्रमुख घटक मांडणार भूमिका

अंतिम वर्षाच्या परीक्षेवर शिक्षण क्षेत्रातील प्रमुख घटक मांडणार भूमिका

Next
ठळक मुद्देप्राचार्य,प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी संघटना येणार एकत्र

पुणे : अंतिम वर्षाच्या परीक्षेच्या विषयाला सध्या राजकीय रंग चढला असून परीक्षा होणार किंवा नाही याबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.मात्र, राज्यातील लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य सध्या टांगणीला लागले आहे. त्यामुळे विद्यार्थी हिताचा विचार करून प्राचार्य, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना यावर आपली एकत्रित भूमिका स्पष्ट करणार आहेत.
 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्याव्यात किंवा घेऊ नयेत ,याबाबत शैक्षणिक तज्ज्ञांमध्ये मतमतांतरे आहेत. त्यातच गेल्या काही दिवसांपासून राजकीय पक्षांच्या हालचालीमुळे या विषयाला राजकीय रंग चढल्याचे दिसून येत आहे.परंतु,यातून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे विद्यार्थी केंद्रबिंदू मानून, प्राचार्य महासंघ, एम.फुक्टो (प्राध्यापक संघटना) व महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघ या शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या अराजकीय संघटनांनी यावर एकत्रितपणे भूमिका मांडण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
अंतिम वर्षांच्या परीक्षेबाबत गेल्या काही दिवसांपासून जाहीर केल्या जात असलेल्या निर्णयामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. मात्र, परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांचा निकाल जाहीरकरण्याचे काम प्राचार्य, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून केले जाते. या घटकांना विश्वासात घेतल्याशिवाय परीक्षा घेण्याची व निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही.मात्र, विविध राजकीय पक्षांकडून परीक्षांबाबत वेगवेगळ्या भूमिका घेतल्या जात आहेत. त्यातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अंतिम वर्षांच्या परीक्षेवर जाहीर केलेल्या निर्णयानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी  विद्यापीठ कायद्यातील तरतुदीनुसार अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत निर्णय घेण्यात येईल,असे राज्य शासनाला नुकतेच कळविले. त्यामुळे अधिकच गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.
-------------------
सध्या राज्यातील लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा घेणे व निकाल जाहीर करणे, याबाबत शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या घटकांनी बोलले पाहिजे.  संस्थाचालक, प्राचार्य ,प्राध्यापक व शिक्षकेतर संघटनांचे प्रतिनिधी यांनी एकत्र येऊन परीक्षांसंदर्भात काय करावे ? याबाबत एका व्यासपीठावर येऊन शासन व समाजासमोर वेगवेगळे पर्याय ठेवले पाहिजेत.प्राचार्य संघटनेतर्फे त्यादृष्टीने पुढाकार घेतला जाईल.- प्रा.नंदकुमार निकम,अध्यक्ष,प्राचार्य महासंघ, 
------------
 विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान न होऊ देता शिक्षण क्षेत्रातील घटकांनी कायद्याच्या चौकटीत बसणारे परीक्षासंदर्भातील पर्याय शासन व समाजासमोर ठेवले पाहिजेत, यात कुठलेही दुमत नाही. त्यामुळे प्राध्यापक संघटनेतर्फे यावर अभ्यासपूर्ण  भूमिका मांडली जाईल. - प्रा.एस.पी. लवांडे, सचिव, एम.फुक्टो
----------------------
परीक्षांबाबत राजकारण न करता विद्यार्थी केंद्रबिंदू मानून त्यांच्या हिताचा निर्णय घ्यायला हवा. विद्यार्थ्यांशिवाय इतर कोणत्याही घटकांना अर्थ नाही. त्यामुळे शिक्षण क्षेत्रातील सर्व घटकांनी एकत्रित येऊन याबाबत सकारात्मक निर्णय घेतला पाहिजे.

-  विजय निकम ,अध्यक्ष ,महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघ

Web Title: The role of education sector people about final year exams will be soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.