'त्या' डॉक्टरकडे मोठं घबाड असल्याची अफवा पोहचली थेट मध्यप्रदेशापर्यंत, चोरटयांचा दरोडा लोणावळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2021 09:51 PM2021-07-29T21:51:37+5:302021-07-29T22:05:00+5:30

लोणावळ्यात दरोडा टाकल्याप्रकरणी आरोपी मध्य प्रदेशातून जेरबंद; १५ जणांना अटक : ३० लाखांचा ऐवज हस्तगत

Robbery in the Lonavala after Rumors spread till Madhya Pradesh about 'that' doctor | 'त्या' डॉक्टरकडे मोठं घबाड असल्याची अफवा पोहचली थेट मध्यप्रदेशापर्यंत, चोरटयांचा दरोडा लोणावळ्यात

'त्या' डॉक्टरकडे मोठं घबाड असल्याची अफवा पोहचली थेट मध्यप्रदेशापर्यंत, चोरटयांचा दरोडा लोणावळ्यात

Next

पुणे : लोणावळा येथील डॉ. खंडेलवाल यांच्या बंगल्यावर पडलेल्या धाडसी दरोड्यातील आरोपींना ग्रामीण पोलिसांनी तब्बल २४ दिवस मध्य प्रदेशात तळ ठोकून जेरबंद केले आहे. यातील सर्व १५ आरोपींना पोलिसांनी पकडले असून त्यांच्याकडून २३ लाख ६८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने, ६ लाख २६ हजार रुपयांची रोकड, ५७ हजार ५०० रुपयांचे मोबाईल असा ३० लाख ५२ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

लोणावळा येथील डॉ. हिरालाल खंडेलवाल (वय ७३) यांचे खाली हॉस्पिटल असून वरच्या मजल्यावर ते राहतात. १७ जून २१ रोजी पहाटे एकच्या दरम्यान खिडकीवाटे आत शिरून चोरट्यांनी डॉक्टर व त्यांच्या पत्नीचे हातपाय बांधून घरातील ५० लाख रुपये रोख, सोन्याचे दागिने असा ६६ लाख ७७ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. त्यावेळी जोरदार पाऊस सुरू असल्याने खाली हॉस्पिटलमध्ये असलेल्या स्टाफला वरच्या मजल्यावरील घटनेची काहीही खबर मिळाली नाही. डॉक्टरांनी आपले हातपाय सोडवून घेऊन बेल वाजवून इतरांना याची माहिती दिली.

या गुन्ह्याचा तपास करीत असताना ग्रामीण पोलिसांना लोणावळा रेल्वे स्टेशनवरील सीसीटीव्ही व तांत्रिक विश्लेषणातून काही जणांची माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांनी काही आरोपींना पकडले. त्यांच्याकडील चौकशीतून मध्यप्रदेशातील हेमंत कुसवाह व त्याच्या साथीदारांची माहिती मिळाली. स्थानिक गन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे व त्यांच्या सहकार्यांनी तब्बल २४ दिवस मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात तळ ठोकून यातील प्रमुख सूत्रधारासह चौघांना अटक केली.

हेमंत कुसवाह (वय २४), प्रशांत कुसवाह (वय २७), दौलत पटेल (वय २४), गोविंद कुशवाह १८), प्रदीप धानुक (वय २८, सर्व रा. रहातगड, जि. सागर), नथु विश्वासराव, सुनिल शेजवळ , रवींद्र पवार, शामसुंदर शर्मा, मुकेश राठोड, सागर धोत्रे, दिनेश अहिरे, विकास गुरव, संजय शेंडगे अशी आरोपींची नावे आहेत.

अफवेमुळे पडला दरोडा

डॉ. खंडेलवाल यांच्याकडे कोट्यवधी रुपयांची रोकड असल्याची अफवा गेल्या वर्ष दोन वर्ष मावळ भागात मोठ्या प्रमाणावर आहे. त्यातूनच हा दरोडा पडला असल्याचे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांची पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी उपविभागीय अधिकारी नवनीत कॉंवत, पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट उपस्थित होते.

डॉ. खंडेलवाल यांच्याकडे कोट्यवधीची कॅश असल्याची अफवा पोलीस तसेच आयकर विभागापर्यंत पोहचली होती. गेल्या वर्षी ग्रामीण पोलिसांनी त्याची खातरजमा करुन तसा पंचनामाही केला होता. हे सर्व आरोपी आरे काॅलनीतील चित्रनगरीत कामगार म्हणून काम करतात. त्यातून त्यांचा एकमेकांशी संबंध आला.

असा पडला दरोडा
नथु विश्वासराव हा मावळ तालुक्यातील औंढोली येथील राहणार असून तो आरे काॅलनीत काम करतो. त्याने डॉ. खंडेलवाल यांच्याकडे कोट्यवधीची संपत्ती असल्याबाबतची माहिती सुनिल शेजवळ याला दिली. त्याने ही माहिती शामसुंदर शर्मा, दिनेश अहिरे यांना दिली. मुख्य सुत्रधार हेमंत कुसवाह हा आरे कॉलनीत येजा करीत असतो. त्याच्या कानावर ही माहिती पोहचली. त्याच्यावर यापूर्वी महाराष्ट्र, गोवा,उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशात काही गुन्हे दाखल आहेत. त्याने दरोड्याचा कट रचला. ते सर्व जण घटनेच्या सायंकाळी रेल्वेने लोणावळ्यात आले. मध्यरात्रीनंतर भर पावसात ते डॉ. खंडेलवाल यांच्या बंगल्यावर गेले. स्थानिकांनी त्यांना हा बंगला दाखविला. त्यानंतर खिडकीवाटे प्रवेश करुन १२ जणांनी हा दरोडा टाकला. त्यांना जी माहिती मिळाली, त्यापैकी डॉक्टरांकडे केवळ ५० लाखांची रोकड मिळाली. रोकड व दागिने त्यांनी आपसात वाटून घेतले.

मंदिराला देणगी

मिळालेल्या या पैशांमधून आरोपीनी गाड्या, कपडे, मोबाईल अशी मोठी खरेदी केली आहे. काहींनी त्यांच्यावरील कर्ज भागविली. एकाने आपल्या वाट्यातून दीड लाख रुपयांची देणगी गावातील मंदिरासाठी दिली.

ही कामगिरी पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, सहायक निरीक्षक नेताजी गंधारे, सचिन काळे, उपनिरीक्षक रामेश्वर धोंगडे, अमोल गोरे, सहायक उपनिरीक्षक सुनिल जावळे, शब्बीर पठाण, हवालदार महेश गायकवाड, सचिन गायकवाड, निलेश कदम, प्रकाश वाघमारे, मुकुंद अयाचित, पोलीस अंमलदार अजित भुजबळ, मंगेश ठिगळे, बाळासाहेब खडके, अक्षय नवले, प्रमोद नवले, मुकेश कदम, अक्षय जावळे, राजेंद्र थोरात, दत्तात्रय जगताप, विद्याधर निचीत, दत्तात्रय तांबे, अंजय मोमीन, सुभाष राऊत, गरुनाथ गायकवाड, जनार्धन शेळके, ज्ञानेश्वर क्षीरसागर, हनुमंत पासलकर, विक्रमसिंह तापकीर, सूर्यकांत वाणी, चंद्रकांत जाधव, अमोल शेडगे, काशिनाथ राजापुरे, समाधान नाईकनवरे यांनी केली.

Web Title: Robbery in the Lonavala after Rumors spread till Madhya Pradesh about 'that' doctor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app