बारामतीत आचार्य कुटुंबियांच्या अपघातानंतर रास्तारोको आंदोलन; सुरक्षित रस्त्यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 20:33 IST2025-07-28T20:33:27+5:302025-07-28T20:33:41+5:30
Baramati News: आचार्य कुटुंबातील चौघांचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर संतप्त झालेल्या बारामतीकरांनी सोमवारी (दि. २८) रस्त्यावर उतरून आंदोलन केले. खंडोबानगर येथील महात्मा फुले चौकात सकाळी ११ वाजता नागरिकांनी ठिय्या आंदोलन सुरू केले.

बारामतीत आचार्य कुटुंबियांच्या अपघातानंतर रास्तारोको आंदोलन; सुरक्षित रस्त्यांची मागणी
बारामती - आचार्य कुटुंबातील चौघांचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर संतप्त झालेल्या बारामतीकरांनी सोमवारी (दि. २८) रस्त्यावर उतरून आंदोलन केले. खंडोबानगर येथील महात्मा फुले चौकात सकाळी ११ वाजता नागरिकांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. या भागातील रस्त्यावर गतीरोधक (स्पीडब्रेकर) बसवण्याची मागणी करत, उदासीन प्रशासनामुळे हा अपघात घडल्याचा आरोप आंदोलकांनी केला. सुमारे दोन तास चाललेल्या या रास्तारोको आंदोलनानंतर प्रशासनाने गतीरोधकाचे काम सुरू केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
रविवारी खंडोबानगर परिसरात घडलेल्या भीषण अपघातात आचार्य कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला. हा अपघात प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे घडल्याचा आरोप स्थानिकांनी केला. यापूर्वीही या भागात चार ते पाच अपघात घडले असून, पुणे शहरातून येणाऱ्या वाहतुकीमुळे येथे नेहमीच वर्दळ असते. वारंवार मागणी करूनही प्रशासनाने गतीरोधक बसवण्याकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांचा संताप अनावर झाला. आंदोलकांनी अपघाताला जबाबदार असणाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, तसेच डंपरचालक आणि मालकावर कारवाई करावी, अशी मागणी केली.
प्रशासनाचा प्रतिसाद
प्रांताधिकारी वैभव नावडकर यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन नागरिकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, गतीरोधकाचे काम तातडीने सुरू होईपर्यंत माघार न घेण्याची भूमिका आंदोलकांनी घेतली. नावडकर यांनी पावसाळ्यात हॉटमिक्स प्रकल्प बंद असल्याचे सांगितले, परंतु डांबर उपलब्ध करून सायंकाळी काम सुरू करण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार, काम सुरू झालyanंतर आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले, अशी माहिती खंडोबानगर येथील आंदोलक चंदू लोंढे यांनी दिली.
प्रांताधिकाऱ्यां निवेदन
खंडोबानगर येथील या अपघाताने बारामतीकरांचे मन हेलावले आहे. भविष्यात सुरक्षित प्रवास आणि अपघातमुक्त बारामतीसाठी, शहरातील विविध भागांतून नागरिकांनी दिलेल्या सूचनांचे निवेदन प्रांताधिकाऱ्यांना सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी मंगळवारी (दि. २९) सकाळी रिंग रोड येथील नवीन प्रशासकीय भवनात सर्व बारामतीकरांनी उपस्थित राहावे, असे आवाहन समस्त बारामतीकरांनी केले आहे.