कलेच्या माध्यमातून नदी संवर्धनाचा ध्यास - माधवी कोलते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 11:37 PM2018-08-17T23:37:51+5:302018-08-18T00:12:51+5:30

कलेच्या माध्यमातून समाजासाठी व पर्यावरणासाठी काही तरी करण्याचा ध्यास घेऊन नदी संवर्धनासाठी काम करणाऱ्या ‘जीवित नदी’ या संस्थेला त्यांनी मदत करण्याचे ठरविले आहे.

River saving through Art - Madhavi Kolte | कलेच्या माध्यमातून नदी संवर्धनाचा ध्यास - माधवी कोलते

कलेच्या माध्यमातून नदी संवर्धनाचा ध्यास - माधवी कोलते

Next

कलेच्या माध्यमातून समाजासाठी व पर्यावरणासाठी काही तरी करण्याचा ध्यास घेऊन नदी संवर्धनासाठी काम करणाऱ्या ‘जीवित नदी’ या संस्थेला त्यांनी मदत करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी त्यांनी आपल्या शिल्पांचे, चित्रांचे प्रदर्शन भरविले आहे. या प्रदर्शनातून जमा होणारा निधी त्या जीवित नदी या संस्थेला देणार आहेत. जीवित नदी ही संस्था नदीला गतवैभव मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे या संस्थेच्या कामात सहभागी होऊन त्यांना मदत करण्यासाठी तीन दिवस प्रदर्शन आयोजित केल्याची माहिती शिल्पकार माधवी कोलते यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

मला लहानपणापासून चित्रांची आवड आहे. कलेचे आकर्षण निर्माण झाल्याने मी शिल्प, चित्रकलेकडे वळले. माझे गुरू बालवाड यांच्या स्टुडिओमध्ये एकदा गेले होते. तेव्हा तिथे मला शिल्पाची अधिक माहिती समजली. त्यातून मला या क्षेत्रात येण्याची प्रेरणा मिळाली. मी सुमारे दोन वर्षे त्यांच्याकडे शिल्पकलेचा अभ्यास केला. दोन वर्षांत काम करायला शिकले.
मला पर्यावरणाची खूप आवड आहे. त्यामुळे माझ्या शिल्पात, चित्रातही निसर्ग येऊ लागला. माझा स्वभावच मुळात निसर्गाच्या जवळ जाणारा आहे. परिणामी माझं आणि निसर्गाचं एक नातं निर्माण झालं आहे. त्यामुळे माझ्या कामातही ते आपसुकच येते.
गेल्या अनेक वर्षांमध्ये पुण्यात अनेक बदल झाले आहेत. हे बदल मला दिसले. सर्वजण प्रगती करत आहेत, पण पर्यावरणाचा मात्र ºहास होत आहे. त्याकडे अनेकांचे दुर्लक्ष होत आहे. पर्यावरणाच्या दृष्टिने घातक होणारे बदल मला त्रास देऊ लागले. त्यामुळे मी त्याबाबत अभ्यास करू लागले. हे बदल योग्य नाहीत, हे माझ्या मनाला समजलं. मग मी लोकांशी त्याबाबत बोलू लागले. पर्यावरण संवर्धन करणे गरजेचे आहे, निसर्गाची जपवणूक केली पाहिजे. याबाबत मी नागरिकांना सांगू लागले. दरम्यान माझ्या कामातही याचा प्रभाव होऊ लागला. मी माझ्या कामात पर्यावरण संवर्धनाचा विषय घेऊ लागले.
गेल्या पंधरा वर्षांपासून मी या क्षेत्रात काम करीत आहे. माझ्या शिल्पांना, चित्रांना नागरिक दाद देत आहेत. महाराष्टÑाबाहेरदेखील माझ्या कामाला प्रोत्साहन मिळू लागले. लोक पर्यावरणावर बोलू लागले. माझ्याशी संपर्क करू लागले. अनेकजण मला म्हणाले, की तुम्ही चित्रात, शिल्पात पर्यावरणाचा विषय दाखवता, पण त्यासाठी काही करता का? प्रत्यक्ष काही कृती करता का? असे प्रश्न मला विचारण्यात येऊ लागले. तेव्हा मी विचार केला, की मी केवळ पर्यावरणाचा विषय लोकांसमोर मांडत आहे. परंतु, त्यासाठी प्रत्यक्ष कृती करत नाही. तेव्हा मग मी ठरवले की पर्यावरण संवर्धनासाठी काही तरी करायचे. मग माझ्या संपर्कात ‘जीवित नदी’ ही संस्था आली.
ही संस्था नदी वाचविण्यासाठी काम करीत आहे. त्यांचे अनेक कार्यकर्ते त्यासाठी झटत आहेत. शाळेतील विद्यार्थ्यांना ते नदीचे महत्त्व पटवून देतात. रिव्हर वॉकद्वारे नदी काय आहे, तिचा इतिहास ही माहिती दिली जाते. त्यांच्या कामात मी देखील सहभागी झाले. मी मग इकॉलॉजिकल सोसायटीचा पर्यावरणाचा कोर्स पूर्ण केला. त्यातून मला अनेक चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या. माझी पर्यावरणाबाबतची जाणीव अधिक स्पष्ट झाली आणि मी नदीसाठी ठोस काम करण्यासाठी विचार करू लागले. त्यातून जीवित नदीला निधी उभा करून देण्यासाठी प्रदर्शन आयोजित करण्याचा विचार मनात आला आणि तो प्रत्यक्षात उतरविला. आज या प्रदर्शनाचे उद्घाटन माजी मिस वर्ल्ड युक्ता मुखी यांच्या हस्ते झाले. त्या देखील पर्यावरणावर प्रेम करतात. त्यामुळे त्यांनी लगेच कार्यक्रमाला येण्याचे मान्य केले. हे प्रदर्शन उद्या (दि.१८) आणि परवा (दि.१९) दर्पण आर्ट गॅलरी, पत्रकारनगर येथे भरविले आहे.
सध्या नदीची भयंकर स्थिती निर्माण झाली आहे. पूर्वी जे नदीविषयीचे आपले थेट नाते होते, ते कमी झाले आहे. आता नळात पाणी येत असल्याने आपण नदीच्या संपर्कात येत नाही. त्यामुळे आपलं आणि तिचं नातं तुटलं आहे.
लोकांनी आपणहून नदीच्या संपर्कात राहून तिला जपलं पाहिजे. कारण आपण नदीच्या काठी आपलं शहर निर्माण केलं आहे. त्यामुळे तिला जपण्याचे कामदेखील आपणच करायला हवे. तरच ही नदी जिवंत राहू शकणार आहे.

Web Title: River saving through Art - Madhavi Kolte

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app