सायबर गुन्ह्यांचा दर आठवड्याला घेणार आढावा : डॉ़. के़. व्यंकटेशम
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2018 21:10 IST2018-10-17T21:05:40+5:302018-10-17T21:10:37+5:30
शहरातील वाढत्या सायबर गुन्ह्यांचा तपासासाठी स्वतंत्र सायबर पोलीस ठाण्याचे सुरु करण्यात येत आहे़.

सायबर गुन्ह्यांचा दर आठवड्याला घेणार आढावा : डॉ़. के़. व्यंकटेशम
पुणे : शहरातील वाढत्या सायबर गुन्ह्यांचा तपासासाठी स्वतंत्र सायबर पोलीस ठाण्याचे सुरु करण्यात येत आहे़. प्रत्येक पोलीस ठाण्यात सायबर गुन्ह्यांच्या तपासासाठी स्वतंत्र प्रशिक्षित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक नेमण्यात येणार असून या गुन्ह्यांमध्ये तज्ञांचे मार्गदर्शन होण्यासाठी दर आठवड्याला आढावा घेण्यात येऊन माहिती देवाण घेवाण करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त डॉ़. के़. व्यंकटेशम यांनी सांगितले़.
पुण्यातील पहिल्या सायबर पोलीस ठाण्याचे औपचारिक उद्घाटन मंगळवारी करण्यात आले़. त्यानंतर बुधवारी पत्रकार परिषदेत डॉ़. व्यंकटेशम यांनी सांगितले, जानेवारीपासून आतापर्यंत सायबर गुन्ह्याविषयी ४ हजार ४६१ तक्रार अर्ज आले आहेत़. त्यापैकी ३ हजार ५९२ अर्ज पोलीस ठाण्यांकडे हस्तांतरीत करण्यात आले असून ५५ गुन्हे दाखल झाले आहेत़. १ हजार ६५९ अर्ज प्रलंबित आहेत़ सध्या सायबर पोलीस ठाण्याला ४ पोलीस निरीक्षक व ९ सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक देण्यात आले आहेत़ गरज भासेल, त्यानुसार अधिक अधिकारी व कर्मचारी देण्यात येणार आहे़.
सायबर गुन्ह्यांच्या तपासासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात एक अधिकारी व ३ कर्मचारी यांचे पथक असेल़. त्यांना सायबर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांकडून सहकार्य, मार्गदर्शन मिळेल़. प्रत्येक आठवड्याला पोलीस ठाण्यातील अधिकारी व सायबर सेलचे अधिकारी हे एकमेकाबरोबर तपासातील अडचणी, केलेला तपास या माहितीची देवाणघेवाण करतील़.
जानेवारीपासून आतापर्यंत सायबर गुन्ह्यातील सायबर गुन्ह्यातील ३ कोटी ९३ लाख रुपये परत मिळवून दिले आहेत़. गेल्या आठवड्यात ११ अर्जदारांना साडेतीन लाख रुपये मिळवून देण्यात आले असल्याचे पोलीस उपायुक्त ज्योतीप्रिया सिंह यांनी सांगितले़. यावेळी सहपोलीस आयुक्त शिवाजी बोडखे, अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे उपस्थित होते़.
.................
डीएसकेच्या ठेवीदारांना पैसे देण्यासाठी प्रयत्न
डी़. एस़. कुलकर्णी यांच्या जप्त केलेली मालमत्ता तसेच त्यांचा वाहनांचा लिलाव लवकरात लवकर करुन त्यातून मिळणारे पैसे ठेवीदारांना कसे देता येतील याचा अभ्यास करण्यात येत असून त्यासाठी संबंधितांची बैठक घेण्यात येत आहे, असे डॉ़ व्यंकटेशम यांनी सांगितले़.