परतीच्या पावसाने शिरदाळेतील ज्वारी पिकाला नवजीवन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 18:02 IST2025-10-29T18:01:51+5:302025-10-29T18:02:33+5:30
ज्वारी पिकाला याचा भरपूर फायदा झाला असून, त्यामुळे भविष्यात जनावरांना कडबा, तसेच ज्वारीचे धान्य होण्यास मदत होणार

परतीच्या पावसाने शिरदाळेतील ज्वारी पिकाला नवजीवन
मंचर : परतीच्या पावसाने आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील शिरदाळे परिसरात ज्वारी पिकाला जीवदान मिळाले आहे. यंदा पावसाचे प्रमाण अधिकच पाहायला मिळाले. खरीप हंगाम तसा जास्त पावसामुळे शेतकरी वर्गाला डोळ्यात पाणी आणणारा ठरला, परंतु कोरडवाहू क्षेत्र असलेल्या शिरदाळे परिसरात गेल्या काही दिवसांपासून परतीच्या पावसाने चांगली हजेरी लावल्याने रब्बी हंगाम जोमात आहे.
ज्वारी पिकाला याचा भरपूर फायदा झाला असून, त्यामुळे भविष्यात जनावरांना कडबा, तसेच ज्वारीचे धान्य होण्यास मदत होणार आहे. लवकर पेरणी झालेले ज्वारी पीक आता कमरेच्या उंचीचे झाले आहे, तसेच बटाटा, सोयाबीन ही पिके निघाल्यानंतर झालेली ज्वारीची पेरणी आणि त्यासाठी झालेला हा पाऊस पूरक असून, त्यामुळे शेतकरी समाधानी आहे. खरीप नाही, तर रब्बी हंगाम तरी हातात येईल, या आशेवर शेतकरी आहे. ज्वारीबरोबर हरभरा पिकालाही याचा चांगला फायदा होणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
हा परतीचा पाऊस रब्बी हंगामाला जीवदान देणारा पाऊस आहे. पाऊस झाला नसता, तर ज्वारी पीक येणे शक्य नव्हते. त्यामुळे कमीतकमी ज्वारीचे पीक आल्याने उन्हाळ्यातील चाऱ्याचा आणि धान्याचा प्रश्न मिटण्याची शक्यता आहे. भविष्यात अजून एखादा पाऊस झाला, तर ज्वारीचे पीक नक्की येईल, असे शिरदाळेचे माजी उपसरपंच मयूर सरडे यांनी सांगितले.