निसर्गदृश्यांसह प्रवासासाठी व्हिस्टाडोम कोचला प्रतिसाद;मागील वर्षात सात कोटींचे उत्पन्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 11:00 IST2025-11-08T10:59:46+5:302025-11-08T11:00:48+5:30
- सहा महिन्यांत ३६ हजार प्रवाशांनी केला प्रवास; चार कोटी २ लाख इतके उत्पन्न

निसर्गदृश्यांसह प्रवासासाठी व्हिस्टाडोम कोचला प्रतिसाद;मागील वर्षात सात कोटींचे उत्पन्न
पुणे : रेल्वे प्रवासात प्रवाशांना निसर्ग, डोंगर, दऱ्या, धबधबे यांचा आनंद घेता यावा, यासाठी पुणे विभागातील डेक्कन एक्स्प्रेस, शताब्दी, डेक्कन क्वीन, प्रगती एक्स्प्रेस या चार गाड्यांना व्हिस्टाडोम कोच जोडण्यात आला आहे. याला प्रवाशांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. एप्रिल ते ऑक्टोबर या सहा महिन्यांत पुण्यातून ३७ हजार प्रवाशांनी व्हिस्टाडोम कोचमधून प्रवास केला आहे. याद्वारे पुणे विभागाला चार कोटी २ लाख इतके उत्पन्न मिळाले आहे.
मुंबई-गोवा आणि मुंबई-पुणे या दरम्यानचा रेल्वे प्रवास डोंगरदऱ्यांतून होतो. शिवाय वळणावळणाचा मार्ग, शेजारीच घाट रस्ता यामुळे हा प्रवास अनुभवण्यासारखा असतो. यामुळे मध्य रेल्वे विभागाकडून मुंबई-गोवा व मुंबई-पुणे मार्गावरील काही गाड्यांना व्हिस्टाडोम कोच बसविण्यात आले आहेत. त्यामध्ये पुणे विभागातून धावणाऱ्या चार गाड्यांचा समावेश आहे. २०१८ मध्ये मुंबई-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये पहिला व्हिस्टाडोम कोच बसिवण्यात आला होता. या कोचला प्रचंड प्रतिसाद मिळाल्यानंतर २६ जून २०२१ पासून मुंबई-पुणे डेक्कन एक्स्प्रेसला व्हिस्टाडोम कोच जोडण्यात आला. तिसरा व्हिस्टाडोम कोच १५ ऑगस्ट २०२१ पासून डेक्कन क्वीनला जोडण्यात आला. तर २५ जुलै २०२२ रोजी चौथा व्हिस्टाडोम कोच प्रगती एक्स्प्रेसला जोडण्यात आला होता. यामुळे पुणे-मुंबई दरम्यानच्या मार्गावर दऱ्याखोऱ्या, नद्या आणि धबधब्यांची श्वास रोखून धरणारी दृश्ये नागरिकांना अनुभवायला मिळत आहेत.
पावसाळ्यात तर या मार्गावर व्हिस्टाडोममधून जाणे म्हणजे एक विशेष पर्वणीच असते. त्यामुळे प्रवाशांकडून व्हिस्टाडोम कोचला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पुणे-मुंबई मार्गावर व्हिस्टाडोमला चांगला प्रतिसाद मिळत असताना पुणे-सिकंदराबाद शताब्दीला व्हिस्टाडोम कोच जोडण्यात आला. यामुळे पुणे-सिकंदराबाद शताब्दी एक्स्प्रेसच्या प्रवाशांना उजनी बॅकवॉटर, भिगवणजवळील उजनी धरण, विकाराबादजवळील अनंतगिरी टेकड्यांमधून जाताना जंगलातील निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेण्यास मिळत आहे.
-------------
मागील वर्षात सात कोटींचे उत्पन्न
पुणे विभागातून धावणाऱ्या डेक्कन एक्स्प्रेस, शताब्दी, डेक्कन क्वीन, प्रगती एक्स्प्रेसच्या व्हिस्टाडोममधून मागील सहा महिन्यांत ३५ हजार ९९३ प्रवाशांनी प्रवास केला आहे. यामधून पुणे रेल्वे विभागाला ४ कोटी २ लाख १७ हजार इतके उत्पन्न मिळाले आहे. नागरिकांच्या वाढत्या प्रतिसादामुळे प्रवाशांना कधी कधी एक ते दोन महिने व्हिस्टाडोमचे तिकीट मिळत नाही. गेल्या आर्थिक वर्षात विभागातील चार गाड्यांमधून ६१ हजार ४०५ प्रवाशांनी प्रवास केला आहे. यामधून पुणे रेल्वे विभागाला ६ कोटी ७८ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
व्हिस्टाडोममधील प्रवाशांची आकडेवारी
गाडी --- प्रवासी संख्या --- उत्पन्न
डेक्कन एक्स्प्रेस--९३८०--७२२४६११
शताब्दी एक्स्प्रेस --८०३९--१६७७७१११
डेक्कन क्वीन -- ८९४४--८१७२०९५
प्रगती एक्स्प्रेस--९६३०--८०४४०२१
------------------------------------------
एकूण --- ३५,९९३---४,०२,१७,८३८
-----------------
नागरिकांना निसर्गाचा आनंद घेत प्रवास करता यावा, यासाठी चार गाड्यांना व्हिस्टाडोम कोच जोडण्यात आला आहे. याला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
- हेमंत कुमार बेहेरा, जनसंपर्क अधिकारी, पुणे विभाग