Gram Panchayat Election: पोलीस पाटील पदाचा राजीनामा देत उच्चशिक्षित महिला सरपंच पदाच्या रिंगणात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2022 17:49 IST2022-12-16T17:48:08+5:302022-12-16T17:49:16+5:30
उच्च शिक्षित असलेल्या रेश्मा भिसे या २०१७ साली परीक्षा देऊन पोलीस पाटील पदावर विराजमान झाल्या होत्या

Gram Panchayat Election: पोलीस पाटील पदाचा राजीनामा देत उच्चशिक्षित महिला सरपंच पदाच्या रिंगणात
निमगाव केतकी : प्रशासकीय यंत्रणा व पोलीस यंत्रणा यामधील महत्त्वाचा दुवा म्हणून कामं करणाऱ्या राजवडी येथील पोलीस पाटील रेश्मा दिलीप भिसे यांनी गावच्या सर्वांगीन विकासाचा ध्यास घेऊन बिजवडी-राजवडी-वनगळी ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्या रविवारी (दि.१८) होणाऱ्या मतदान प्रक्रियेला सामोऱ्या जात आहेत. परंतु त्यांनी गावच्या सरपंच पदासाठी पोलीस पाटील पदाचा राजीनामा देण्याचा जो निर्णय घेतलाय त्याचे संपूर्ण तालुक्यात चर्चा आहे.
उच्च शिक्षित असलेल्या रेश्मा भिसे या २०१७ साली परीक्षा देऊन पोलीस पाटील पदावर विराजमान झाल्या होत्या. त्यांनी गावांमध्ये शांतता प्रस्थापित करण्याबरोबरच तंटामुक्तीचे कार्य केले. परंतु पोलीस पाटील पदावर असताना त्यांना गावच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या प्रश्नांबाबत उणीव जाणवली. तसेच विकासाच्या दृष्टीकोनातून काही अडचणी वाटल्या. म्हणून त्या सोडवण्याकरिता बिजवडी ग्रुप ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता सरपंच पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याचे त्यांनी सांगितले.