Republic Day 2025 : राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी अभियान
By श्रीकिशन काळे | Updated: January 24, 2025 17:40 IST2025-01-24T17:13:17+5:302025-01-24T17:40:37+5:30
ध्वज गोळा करण्यासाठी शेकडो बॉक्सेस मोफत विरणासाठी उपलब्ध

Republic Day 2025 : राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी अभियान
पुणे : प्रजासत्ताक दिनानिमित्त घरीदारी, वाहनांसाठी घेतले जाणारे राष्ट्रध्वज नंतर इतस्ततः रस्त्यावर,कचऱ्यात पडून त्याचा अवमान होऊ नये म्हणून भारत फ्लॅग फाऊंडेशनने अभियानाद्वारे पुढाकार घेतला आहे. नागरिक आणि संस्थांनी इतस्ततः पडलेले ध्वज आढळल्यास ते भारत फ्लॅग फाऊंडेशन,मुरुडकर झेंडेवाले,पासोडया मारूती मंदिरासमोर, बुधवार पेठ येथे जमा करावेत, असे आवाहन फाऊंडेशनचे संस्थापक गिरिश मुरुडकर, कार्यकारी अध्यक्ष राहुल भालेराव यांनी केले आहे.
या उपक्रमाचे हे २३ वे वर्ष आहे अभियानात पुणेकरांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. मुरुडकर म्हणाले,'१५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या दिवशी राष्ट्रध्वज विकत घेऊन अभिमानाने मिरवला जातो; हेच कागदी आणि प्लास्टिकचे छोटे-छोटे राष्ट्रध्वज त्याच दिवशी रस्त्यावर, इतरत्र पडलेले आढळतात. प्लास्टिकचे ध्वज लवकर नष्टही होत नाहीत, त्यामुळे अनेक दिवस या राष्ट्रध्वजाची विटंबना होते, तसेच ‘प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांची विक्री करणे’, हे कायदाबाह्य ठरते'. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाची अशा प्रकारे होणारी विटंबना रोखण्यासाठी भारत फ्लॅग फाऊंडेशनने पुढाकार घेतला आहे. असे ध्वज गोळा करण्यासाठी शेकडो बॉक्सेस मोफत विरणासाठी उपलब्ध आहेत.
तसेच आपापल्या संस्था, शाळा, कॉलेज, मंडळे येथे लावण्यासाठी ध्वजसंबंधी माहितीपत्रकेही उपलब्ध आहेत. सर्वांनी अभियानात भाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. जमा साहित्याची शास्त्रशुद्ध, सन्मानपूर्वक पद्धतीने प्रक्रिया केली जाते. ज्या तिरंग्यासाठी हजारोनी बलिदान केले,तो तिरंगा पायदळी जाऊ नये,याची काळजी घ्यावी, ध्वजविषयक आदर्श आचारसंहितेचे पालन करावे, असे आवाहनही फाउंडेशन तर्फे करण्यात आले आहे.