भाडेकरार आता मराठीतून, पंधरवड्यात राज्यात कोठूनही करता येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 13:48 IST2025-02-14T13:47:43+5:302025-02-14T13:48:37+5:30

येत्या पंधरवड्यात ही प्रणाली सबंध राज्यभर लागू करण्यात येणार आहे

Rental agreements can now be made in Marathi, from anywhere in the state within a fortnight | भाडेकरार आता मराठीतून, पंधरवड्यात राज्यात कोठूनही करता येणार

भाडेकरार आता मराठीतून, पंधरवड्यात राज्यात कोठूनही करता येणार

पुणे : ऑनलाइन भाडेकरार आता राज्यभरातून कुठूनही नोंदविता येणार असून, त्यासाठी भाडेकरार २.० ही प्रणाली प्रायोगिक तत्त्वावर पुणे जिल्ह्यात १७ फेब्रुवारीपासून सुरू करण्यात येत आहे. हा भाडेकरार आता मराठीतून उपलब्ध करून देण्यात आला असून, पक्षकारांची माहिती आधार क्रमांकाद्वारे थेट आधार पोर्टलवरूनच घेण्यात येणार असल्याने फसवणुकीचे प्रकार टळणार आहेत. येत्या पंधरवड्यात ही प्रणाली सबंध राज्यभर लागू करण्यात येणार आहे.

ऑनलाइन भाडेकरारासाठी ‘भाडेकरार १.९’ ही संगणक प्रणाली वापरली जात आहे. गेल्या वर्षभरात राज्यात १३ लाख १० हजारांहून अधिक जास्त भाडेकरार ऑनलाइन पद्धतीने नोंदविण्यात आले आहेत. सध्या नागरिकांचा ऑनलाइन भाडेकरार करण्याकडे कल वाढला आहे. पुणे, ठाणे, मुंबई, नागपूर या विभागात भाडेकरारांची विक्रमी दस्त नोंदणी होत असते. त्यामुळे या प्रणालीतील त्रुटी दूर करण्यासाठी; तसेच अद्ययावत सोयीसुविधा उपलब्ध करण्यासाठी २.० ही अद्ययावत संगणक प्रणाली तयार करण्यात आली आहे.

त्यातील काही त्रुटींची दुरुस्ती करून आता भाडेकरार २.० ही नवीन संगणक प्रणाली अस्तित्वात आली आहे. प्रायोगिक तत्त्वावर पुणे जिल्ह्यात ही प्रणाली १७ फेब्रुवारीपासून अमलात येणार आहे. त्यातील त्रुटी लक्षात घेऊन येत्या पंधरवड्यात ही प्रणाली सबंध राज्यभर उपलब्ध करून दिली जाणार आहे. या प्रणालीमुळे राज्यात एका ठिकाणाहून अन्य जिल्ह्यांत भाडेकरार ऑनलाईन करता येणार आहे, अशी माहिती राज्याचे नोंदणी उपमहानिरीक्षक (माहिती तंत्रज्ञान) अभयसिंह मोहिते यांनी दिली.

या प्रणालीत भाडेकरार आता मराठीत उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच भाडेकरारासाठीचे शुल्क भरण्यासाठी याच पोर्टलवरून क्युआर कोडचा वापर करून ‘पे टू आयजीआर’ या प्रणालीचा वापर करता येणार आहे. पक्षकारांचे आधार क्रमांक यात टाकल्यानंतर त्यांची सबंध माहिती आधार पोर्टलवरूनच मिळविली जाणार आहे. यातून फसवणुकीचे प्रकार टळणार आहेत. या प्रणालीत सुरक्षेसंदर्भातील उपाय अधिक कडक करण्यात आल्याने विभागाला तसेच पक्षकारांना देखील फसवणुकीचे प्रकार टाळता येणार आहेत.

या संगणक प्रणालीत मराठीत करार करता येणार आहे. शुल्क भरण्यासाठीही स्वतंत्र विंडो किंवा वेबसाइटला जावे लागणार नाही. त्याची सुविधा या प्रणालीतच देण्यात आली आहे. येत्या पंधरवड्यात राज्यभर ही प्रणाली लागू करण्यात येईल. - अभयसिंह मोहिते, नोंदणी उपमहानिरीक्षक, माहिती तंत्रज्ञान

Web Title: Rental agreements can now be made in Marathi, from anywhere in the state within a fortnight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.