पुण्यात मेट्रोच्या खोदकामात सापडलेले अवशेष १०० वर्षांपूर्वीचेच; पुरातत्व तज्ज्ञांचे मत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2020 17:56 IST2020-11-27T17:55:36+5:302020-11-27T17:56:39+5:30
मेट्रोच्या शिवाजीनगर ते स्वारगेट या भुयारी मार्गाचे खोदकाम सुरू असताना कामगारांना काही हाडे सापडली..

पुण्यात मेट्रोच्या खोदकामात सापडलेले अवशेष १०० वर्षांपूर्वीचेच; पुरातत्व तज्ज्ञांचे मत
पुणे: मेट्रोच्या भुयारी मार्गासाठी मंडईत सुरू असलेल्या खोदकामात सापडलेले अवशेष प्राण्यांचे असून ते १०० ते १५० वर्षांपुर्वीचे असावेत असा अंदाज डेक्कन पुरातत्व महाविद्यालयातील पुराजैव संशोधक डॉ. पंकज गोयल यांनी सांगितले. काही अवशेष हत्तीचे असावेत, दुसऱ्या प्राण्याच्या अवशेषांची अधिक तपासणी झाल्यानंतर त्याविषयी सांगता येईल असे ते म्हणाले.
मेट्रोच्या शिवाजीनगर ते स्वारगेट या भुयारी मार्गाचे काम सध्या सुरू आहे. मंडईत या मार्गाचे भुयारी स्थानक आहे. तिथे सुरू असलेल्या खोदकामात बुधवारी १० फूट खोलीवर कामगारांना काही हाडे सापडली. त्यातील काही हाडे मोठी होती. मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी डेक्कन पुरातत्व महाविद्यालयाला याची माहिती दिली व त्यांना या अवेशेषांची तपासणी करण्याची विनंती केली.
डॉ. पंकज गोयल यांनी या स्थळी गुरूवारी सकाळी भेट दिली. मेट्रोच्या जनसंपर्क विभागाचे संचालक हेमंत सोनवणे त्यांच्यासमवेत होते. तपासणीनंतर डॉ. गोयल यांनी सांगितले की हे अवशेष फार प्राचिन वगैरे नाहीत. साधारण १०० ते दीडशे वर्षांपुर्वीचे असावेते. काही हाडे हत्ती या प्राण्याची आहेत हे लगेच लक्षात येते. दुसरी काही लहान हाडे आहेत, मात्र त्याची अधिक तपासणी केल्यानंतरच ती कोणत्या प्राण्याची आहेत ते सांगता येईल.
डॉ. सोनवणे यांनी यामुळे मेट्रोच्या कामात काहीही अडथळा निर्माण होणार नाही असे स्पष्ट केले. मेट्रोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची कल्पना दिली आहे. त्यांच्या संमतीनंतर हा ठेवा अधिक माहितीसाठी संशोधकांकडे सुपूर्त केला जाईल अशी माहिती त्यांनी दिली.
वय, मृत्यूचे कारण अशी माहिती देता येईल.
अशा अवशेषांच्या तपासणीचे शास्त्र आता फार प्रगत झाले आहे. मात्र त्याला वेळ लागतो. त्या तपासणीनंतर तो प्राणी कोणता हे तर सांगता येईलच शिवाय त्याचा काळ निश्चित करता येईल, हत्ती व त्या प्राण्याचे वय काय हेही सांगता येईल. तसेच काही आणखी प्रगत तपासण्यांनंतर त्या प्राण्यांचे नैसर्गिक मृत्यू आला की ते अपघाती, शिकारीमुळे निधन पावले हेही सांगता येईल.
डॉ. पंकज गोयल, पुराजैव संशोधक.(२६९)