पुणे: माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आंबेगाव पठार परिसरात आंदेकर टोळीतील सदस्यांनी रेकी केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीसह पिस्टलदेखील ताब्यात घेतले होते. वनराज यांचा खुनातील मुख्य आरोपी सोमनाथ गायकवाड, अनिकेत दुधभाते यांच्यासह अन्य आरोपींची घरे या परिसरात आहेत. त्यांच्या घरांची रेकी करण्यात आल्याचे पोलिस तपासात समोर आले होते. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. तो तपास आता पुन्हा भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याकडे तपासासाठी वर्ग करण्यात आला असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी दिली.
महिनाअखेरीस भारती विद्यापीठ पोलिसांनी दत्ता बाळू काळे (रा. डोके तालमीच्या मागे, गणेश पेठ) याला पकडले. त्याच्याकडे चौकशीत रेकी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. आंदेकर टोळीच्या रडारवर कोण होते हेदेखील तपासात निष्पन्न झाले आहे. वनराज यांचा खून करणारे सर्व आरोपी सध्या कारागृहात आहेत. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात रात्री आठच्या सुमारास वनराज यांचा टोळक्याने पिस्तुलातून गोळीबार करत तसेच कोयत्याने वार करून खून केला होता. या प्रकरणात कृष्णा आंदेकर, दत्ता बाळू काळे, यश मोहिते, अमन पठाण, यश पाटील, सुजल मिरगू, अमित पाटोळे, स्वराज वाडेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात होता. दरम्यान, आंबेगाव पठार येथील प्लॅन फसल्यानंतर ५ सप्टेंबर रोजी आयुष कोमकर याचा गोळ्या घालून खून करण्यात आला होता. याप्रकरणात बंडू आंदेकरसह १५ जणांना अटक करण्यात आली आहे. सध्या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडून सुरू असून यामध्ये पुरावे गोळा केले जात आहे. दुसरीकडे भारती विद्यापीठ पोलिसांकडे गुन्हा वर्ग करून या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग होता का, या दृष्टीने अधिक तपास होण्यासाठी हा गुन्हा भारती विद्यापीठ पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.
दत्ताने वनराज यांचा खून करणाऱ्या आरोपींची घरे पाहिली
कृष्णा आंदेकर याने खोलीसाठी पाच हजार रुपये देऊन दत्ता काळे याला मोहितेसोबत आंबेगाव पठार परिसरात पाठवले होते. त्यानंतर ३० ऑगस्ट रोजी रात्री दहाच्या सुमारास दत्ताने वनराज यांचा खून करणाऱ्या आरोपींची घरे पाहिली. त्याची माहिती त्याने कृष्णाला व्हॉट्सॲप कॉलद्वारे दिली. त्या वेळी कृष्णाने अमनला पाठवतो, असे सांगितले. मात्र, तो आला नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी दत्ताने परत कृष्णाला वारंवार फोन केल्याचे पोलिसांना दिसून आले आहे. कृष्णाने कॉल न घेतल्यामुळे दत्ताने यश पाटील याला कॉल केला. त्या वेळी यशने दत्ताला अमनला कॉल करण्यास सांगतो, असे म्हटले होते. त्यानंतर दुपारी साडेबाराच्या सुमारास कृष्णाने दत्ताला कॉल करून सात ते आठ जणांना पाच वेपन (पिस्टल) घेऊन पाठवले आहे, असे सांगितले होते.
आयुष कोमकर खून प्रकरणात आंदेकर टोळीची २७ खाती गोठवली...
आयुष कोमकर खून प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी बंडू आंदेकरच्या घरातून कोट्यवधींचा ऐवज घरझडतीत जप्त केला. त्यानंतर पोलिसांनी बंडू आंदेकर आणि संबंधित टोळीतील सदस्यांची बँकेची तब्बल २७ खाती गोठविली असून, त्या खात्यात ५० लाख ६६ हजार १९९ रुपये इतकी रक्कम असल्याचे समोर आले आहे. ही रक्कम आरोपींच्या मालमत्तेव्यतिरिक्त असून, मालमत्तादेखील कोट्यवधी रुपयांच्या असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, टोळीच्या सर्व सदस्यांच्या स्थावर मालमत्तेची माहिती घेण्याचे काम पोलिसांकडून सध्या सुरू आहे.