पुणे: पोलिस खात्यात तसेच तलाठी पदावर नोकरी लावण्याच्या आमिषाने एकाने दोन तरुणींची ३० लाख ५ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी २९ वर्षीय तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून सागर सुखदेव जाधव (रा. गंजपेठ, सध्या रा. चंद्रभागा नगर, लेन नं. २, भारती विद्यापीठ) याच्याविरोधात भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणी मूळची सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात असलेल्या आहीरे गावची आहे. तरुणी पोलिस भरतीची तयारी करत होती. एका ओळखीच्या व्यक्तीमार्फत तिची आरोपी जाधव याच्याशी २०२२ मध्ये ओळख झाली होती. आरोपीने तरुणीला पोलिस दलात भरतीचे आमिष दाखवून तिच्याकडून वेळोवेळी ऑनलाइन, तसेच रोख स्वरूपात ११ लाख १० हजार ५०० रुपये घेतले होते. पैसे घेतल्यानंतर तरुणीने त्याच्याकडे विचारणा केली. तेव्हा त्याने टाळाटाळ सुरू केली. तरुणीने पैसे परत करण्याची मागणी केली. तेव्हा जाधवने तिला एक लाख पाच हजार रुपये परत केले. उर्वरित पैसे परत करण्याची मागणी तरुणीने त्याच्याकडे केली. तेव्हा त्याने तरुणीला उडवाउडवीची उत्तरे दिली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. चौकशीत जाधवने अशाच पद्धतीने आणखी एका तरुणीची २० लाख रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. एका तरुणीला तलाठी पदावर नोकरी लावून देण्याच्या आमिषाने त्याने तिची २० लाख रुपयांची फसवणूक केली आहे. संबंधित तरुणीने याबाबत भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. जाधव याचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. त्याने अशा पद्धतीने अनेकांची फसवणूक केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी पुढील तपास करत आहेत.