ससूनमध्ये पार्किंगसाठी पावती पाचची, ठेकेदार आकारतात दहा रुपये;सर्वसामान्यांची लूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 10:24 IST2025-07-02T10:23:01+5:302025-07-02T10:24:12+5:30

- रुग्णालय प्रशासन मात्र याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करत असल्याचे चित्र आहे.

Receipt for parking at Sassoon Hospital is Rs 5, contractor charges Rs 10; looting of common people | ससूनमध्ये पार्किंगसाठी पावती पाचची, ठेकेदार आकारतात दहा रुपये;सर्वसामान्यांची लूट

ससूनमध्ये पार्किंगसाठी पावती पाचची, ठेकेदार आकारतात दहा रुपये;सर्वसामान्यांची लूट

- संदीप पिंगळे

पुणे : ससून रुग्णालयातील ठेकेदाराकडून पार्किंगच्या नावाखाली रुग्ण व नातेवाइकांची सर्रासपणे लूट करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. ठेकेदारांकडून देण्यात येणाऱ्या पावतीवर अत्यंत लहान अक्षरात तासांप्रमाणे पार्किंगचे दर छापलेले आहेत. परंतु ही पावती वाचताच येऊ नये यासाठी ठेकेदाराच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून पार्किंग दराबाबतच्या माहितीवर जाणीवपूर्वक तारखेचा शिक्का मारला जातो. तसेच दोन तासांसाठी ५ रुपये शुल्क आकारण्याऐवजी दहा रुपये आकारले जातात. दररोज येथे रुग्ण व नातेवाइकांची दीड ते दोन हजारांच्या संख्येने वाहने पार्किंगला लावली जातात. या सर्वांकडून दामदुप्पटीने शुल्क आकारले जात असताना रुग्णालय प्रशासन मात्र याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करत असल्याचे चित्र आहे.

पार्किंगच्या पावतीवर ‘शक्ती कन्स्ट्रक्शन’ असे ठेकेदाराचे नाव नमूद असले तरी ऑनलाइन पेमेंट केल्यावर रूषभ इन्टरप्रायजेस हे नाव निदर्शनास येते. पहिल्या १ ते २ तासांसाठी ५ रुपये शुल्क आहे. तर २ तासांच्या पुढे १२ तासांपर्यंत १० रुपये तसेच १२ तासांच्या पुढे २४ तासांपर्यंत १५ रुपये शुल्क असे दर निश्चित करण्यात आले आहेत. वाहन पार्किंगला लावताच वेळ टाकून पावती हातात दिली जाते. वाहन लावणारी व्यक्ती अर्धा किंवा एक तासात परत आल्यावर त्याला उर्वरित ५ रुपये दिले जात नाही. अनेकदा गाडी पार्किंगला लावते वेळी पावती देणारी व्यक्ती पार्किंगमधून गाडी काढते वेळी हजर नसते. अशावेळी उपस्थित असणाऱ्या व्यक्तीकडे पावती दाखवून उर्वरित पैशाची मागणी केल्यास उडवाउडवीची उत्तरे दिली जातात आणि पैसे परत दिले जात नाहीत. यातून अनेकदा वादाचे प्रसंग उद्भवत असल्याचे नागरिकांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.

खासगी रुग्णालयातील खर्च परवडत नाही म्हणून सर्वसामान्य रुग्ण मोठ्या संख्येने ससूनमध्ये येतात. परंतु येथे रुग्णांची व त्यांच्या नातेवाइकांची ठेकदाराकडून लूट केली जाते. रुग्णालयात ओपीडीत तपासणीसाठी येणारे रुग्ण एक ते दीड तास थांबतात. रुग्णांसोबत थांबणारे व भेटण्यासाठी येणाऱ्या नातेवाइकांना अर्धा तासांपेक्षा जास्त वेळ थांबू दिले जात नाही. अनेकदा रुग्णांसाठी घरून जेवणाचा डबा घेऊन येणाऱ्यांना दिवसातून दोन तीन वेळा रुग्णालयात येणे भाग पडते. प्रत्येकवेळी वाहन पार्किंग करताना नातेवाईक व ठेकदारांच्या कर्मचाऱ्यामध्ये वादाचे प्रसंग उद्भवतात. या बरोबरच ठेकेदाराने पार्किंगसाठी एकाच ठिकाणी जागा न ठेवता ससून रुग्णालयातील परिसरातील इमारतींमध्ये, कंपाऊंडच्या बाजूला, अंतर्गत रस्त्यांच्या बाजूला जागा मिळेल तिथे वाहने लावण्यास सांगून पैसे वसूल केले जात आहेत.

या पूर्वीही येथील पार्किंगचा विषय वादग्रस्त ठरला होता. रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांकडून अनेक तक्रारी झाल्याने व ठेकदाराचा कालावधी संपल्याने गेले काही महिने येथे पार्किंग शुल्क आकारले जात नसल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला होता. मात्र, काही दिवसांपासून अचानक नव्याने ठेकेदाराची माणसे ठिकठिकाणी उभी राहून पार्किंग शुल्क वसूल करताना दिसत आहेत. ठेकेदाराची नेमणूक नसतानाही येणारे रुग्ण व त्यांचे नातेवाईक त्याच मोकळ्या जागांवार वाहने लावत होते. त्यावेळी पार्किंगचा कोणताच प्रश्न उद्भवत नव्हता, मात्र ठेकदाराची नेमणूक करण्यात आली ती नेमकी कशाकरिता? असा सवाल नागरिक उपस्थित करत, ठकेदाराच्या गैरप्रकाराला ससूनच्या अधिकाऱ्यांचे पाठबळ असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

दररोज दीड हजारांच्या आसपास वाहने

पार्किगचा ठेका घेतलेल्या ठेकेदाराने रुग्णालयाच्या आवारात पार्किंग ठिकाणी कुठेच दरपत्रकाचा फलक लावलेला निदर्शनास येत नाही. ससून रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात दररोज २ हजारांहून अधिक रुग्ण उपचार व तपासण्यांसाठी येतात. येथे दाखल असणाऱ्या रुग्णांची संख्याही १ हजार २०० च्यावर आहे. शिवाय रुग्णांसोबत येणारे नातेवाईक व दाखल रुग्णांना भेटण्यासाठी येणाऱ्या नातेवाइकांची संख्या पाहता दररोज अंदाजे ३ हजारांहून अधिक नागरिकांची रुग्णालयात ये-जा होत आहे. यातील वाहनधारकांची संख्या निम्मी धरली तरी दीड हजाराच्या आसपास आहे. या सर्वांकडून सरसकट १० रुपये पार्किंग शुल्क तर रुग्णासोबत थांबणाऱ्याकडून दिवसाला २५ रुपये प्रमाणे पैसे वसूल केले जात आहे. दररोज वसूल होणारी रक्कम पाहता सर्वसामान्यांची होणारी लूट अधोरेखीत होत आहे.

निश्चित करण्यात आलेले दर

१ ते २ तासांसाठी ५ रुपये

२ तासांच्या पुढे १२ तासांपर्यंत १० रुपये

१२ तासांच्या पुढे २४ तासांपर्यंत १५ रुपये

पार्किंगसाठी ऑनलाइन निविदा मागविण्यात आल्या होत्या. या निविदा प्रक्रियेत एकूण ५ ठेकेदारांनी सहभाग नोंदविला होता. त्या पैकी शक्ती कन्स्ट्रक्शन यांची निविदा मंजूर करून त्यांना ठेका देण्यात आला आहे. निविदा देतेवेळी नियम व अटी ठेकेदाराने मान्य केल्या होत्या. निविदेतील अटी, शर्ती व ठरलेल्या दरापेक्षा जास्त शुल्क वसूल केले जात असल्याबाबत माहिती घेण्यात येईल. त्या गैरप्रकार आढळल्यास ठेकेदाराला समज देण्यात येईल. त्या नंतरही गैरप्रकार सुरू असल्याची तक्रार आल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल. - डॉ. गोरोबा आवटे, प्रशासकीय अधिकारी, ससून रुग्णालय

Web Title: Receipt for parking at Sassoon Hospital is Rs 5, contractor charges Rs 10; looting of common people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.