विसर्जनाच्या तयारीसाठी निघालेला रथ झाडात अडकला ; वाहनांच्या लागल्या रांगा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2018 15:41 IST2018-09-19T15:33:45+5:302018-09-19T15:41:08+5:30
गणपती विसर्जनाच्या तयारीसाठी निघालेला रथ झाडांच्या फांद्यांमध्ये अडकल्याने माेठी वाहतूक काेंडी लाॅ काॅलेज रस्त्यावर झाली हाेती.

विसर्जनाच्या तयारीसाठी निघालेला रथ झाडात अडकला ; वाहनांच्या लागल्या रांगा
पुणे : गणपती विसर्जनाची तयारी करण्यासाठी निघालेला रथ रस्त्यावरील झाडांच्या फांद्यांमध्ये अडकल्याने माेठी वाहतूक काेंडी लाॅ काॅलेज रस्त्यावर दुापारी झाली हाेती. सुमारे अर्धा ते पाऊणतास हा रथ काढण्यासाठी लागल्याने वाहनचालकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला.
गणपती विसर्जनाची तयारी करण्यासाठी एका मंडळाचे कार्यकर्ते पीअाेपीची सजावट असलेला रथ घेऊन नळस्टाॅपकडून लाॅ काॅलेजकडे निघाले हाेते. यावेळी फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट अाॅफ इंडिया( एफटीअायअाय) तसेच त्याच रस्त्यावर पुढे असलेल्या झाडांच्या फांद्यांमध्ये हा रथ अडकला. एफटीअायअाय समाेरील झाडामधून हा रथ बाहेर काढण्यात कार्यकर्त्यांना यश अाले, परंतु त्याच रस्त्यावरील पुढील झाडाच्या फांदीमध्ये अडकलेला रथ काढताना कार्यकर्त्यांच्या नाकीनऊ अाले. फांद्यांची उंची अाणि रथाची उंचीचा अंदाज चालकाला न अाल्याने हा रथ फांद्यांमध्ये अडकून पडला. साधारण अर्धा ते पाऊनतास कार्यकर्ते फांद्यांमधून रथ काढण्यासाठी प्रयत्न करत हाेते. हा रथ रस्त्याच्या मधाेमधच अडकल्याने दाेन्ही बाजूने येणारी वाहने अडकून पडली हाेती. एसएनडीटी कडून येणाऱ्या वाहनांच्या तर लांबच लांब रांगा लागल्या हाेत्या.
काही नागरिकांच्या मदतीने कार्यकर्ते वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करत हाेते. परंतु रस्ता अरुंद असल्याने तसेच रथ रस्त्याच्या मधाेमधच अडकल्याने दाेन्हीकडून वाहतूक काेंडी झाली. अथक प्रयत्नानंतरही रथ पुढे सरकत नसल्याने फांद्या कापण्याचा निर्णय कार्यकर्त्यांनी घेतला. त्यासाठी काही कार्यकर्ते कुऱ्हाड अाणायलाही गेले. काही वेळाने कार्यकर्त्यांनीच कसाबसा फांद्यांमध्ये अडकलेला रथ बाहेर काढला. तेव्हा सर्वांनीच सुटकेचा निश्वास साेडला.