'आपली बायको पास' असे लिहून तरूणीचा विनयभंग; पुण्यातील संतापजनक घटना, सोशल मीडियावर पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2024 11:40 IST2024-06-23T11:39:58+5:302024-06-23T11:40:26+5:30
कात्रज परिसरातील एका १६ वर्षीय मुलीचा कौशल शिंदे नामक युवक वारंवार पाठलाग करुन तिला त्रास देत होता.

'आपली बायको पास' असे लिहून तरूणीचा विनयभंग; पुण्यातील संतापजनक घटना, सोशल मीडियावर पोस्ट
लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे : मुलगी १० वी पास झाल्यानंतर, निकालाच्या दिवशी 'आपली बायको पास' अशी कमेंट सोशल मीडियावर टाकून तसेच तिच्या नावामध्ये वडिलांच्या नावाऐवजी स्वतःचे नाव टाकून आणि फोटो टाकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी वेगवेगळ्या प्रकारे छेड काढून विनयभंग केल्याप्रकरणी तसेच अल्पवयीन मुलीच्या मनास लज्जा निर्माण होईल, असे कृत्य केल्याचा गुन्हा भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे.
कात्रज परिसरातील एका १६ वर्षीय मुलीचा कौशल शिंदे नामक युवक वारंवार पाठलाग करुन तिला त्रास देत होता. तिच्या सोशल अकाऊंटवर तो तिचा पिच्छा पुरवत असे. संबंधित मुलगी ही अल्पवयीन आहे हे माहीत असूनही त्याने, तू मला खूप आवडते, तू हो म्हण नाही तर मी माझ्या जिवाचे बरे-वाईट करून घेईन' असे म्हणून तिला धमकी देखील देत होता. पीडिता झोपलेली असताना तिचा विनयभंग केला, तसेच सोशल मीडियावर पोस्ट करत बदनामीकारक कृत्य केल्याची तक्रार पीडितेने दिली. यावरून पोलिसांनी संबंधित युवकावर गुन्हा दाखल केला आहे.