मला देश ओळखतो, प्रकाश आंबेडकरांनी ओळखण्याची गरज नाही, रामदास आठवलेंचं टीकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2018 17:17 IST2018-05-26T17:17:02+5:302018-05-26T17:17:27+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश आंबेडकर, ज्यांना मी ऐक्यासाठी बोलावूनही ते आले नाहीत ते प्रकाश आंबेडकर, अशा शब्दात सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकर यांना प्रत्युत्तर दिले आहे.

मला देश ओळखतो, प्रकाश आंबेडकरांनी ओळखण्याची गरज नाही, रामदास आठवलेंचं टीकास्त्र
पुणे - 'प्रकाश आंबेडकर यांनी कोण रामदास आठवले म्हटले तरी मी कोण प्रकाश आंबेडकर', असे विचारणार नाही. डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश आंबेडकर, ज्यांना मी ऐक्यासाठी बोलावूनही ते आले नाहीत ते प्रकाश आंबेडकर, अशा शब्दात सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकर यांना प्रत्युत्तर दिले आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गटाचे) राज्यव्यापी अधिवेशन उद्या पुण्यात होत आहे.त्याआधी पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
नुकताच कोपरगाव येथे झालेल्या कार्यक्रमात प्रकाश आंबेडकर यांनी कोण रामदास आठवले, अशा शब्दांत त्यांना झिडकारले होते. त्यांच्या या प्रश्नाला आठवले यांनी खास शैलीत उत्तर दिले. मला सारा महाराष्ट्र आणि देश ओळखतो,त्यांनी मला ओळखण्याची गरज नाही असे त्यांनी आंबेडकर यांना ठणकावले.
आगामी निवडणूक काळात शिवसेना आणि भाजपाने युती केली दोन्ही पक्षांचा फायदा होईल असे मत त्यांनी व्यक्त केले. पालघर आणि भंडारा - गोंदिया येथे भाजप आणि शिवसेनेची भाषा ही निवडणुकीची आहे. मात्र शिवसेनेने युती केली नाही तर त्यांचे काही नेते फुटू शकतात असे भाकितही त्यांनी वर्तवले. त्यामुळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करायचे तर युती करायलाच हवी असेही ते म्हणाले.
या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्धव ठाकरे यांना भेटण्याची विनंती केल्याचे त्यांनी सांगितले.कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या शापाठविधीला एकत्र आलेल्या मोदी विरोधकांवर त्यांनी भाष्य केले.जेवढे विरोधक एकत्र येतील तेवढे मोदींना विजय मिळवण्यास सोपे जाईल असेही ते म्हणाले. भाजपाच्या नव्या धोरणाला अनुसरून त्यांनी नियत साफ, विकास साफ आणि 2019साली कॉँग्रेसही देशातून साफ होईल, अशी भविष्यवाणी त्यांनी केली.