शिव-मनसे युती;थोडा आनंद,थोडे दु:ख अन् बराचसा संभ्रम
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2025 13:16 IST2025-07-06T13:14:51+5:302025-07-06T13:16:29+5:30
पुण्यात काही जणांचा कानोसा घेतला असता हे एकत्रीकरण मुंबई महापालिकेसाठी उपयुक्त ठरू शकणारे असले तरी अन्य शहरांमध्ये मात्र महापालिका निवडणुकीसाठी वेगवेगळा परिणाम होण्याची शक्यता असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.

शिव-मनसे युती;थोडा आनंद,थोडे दु:ख अन् बराचसा संभ्रम
- राजू इनामदार
पुणे - मोर्चा होणार असल्याने सरकारने हिंदी भाषेची सक्ती रद्द केली. त्यामुळे मोर्चा रद्द झाला, पण मुंबईत विजयी मेळावा घेत शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे दुरावलेले ठाकरे बंधू एकत्र आले. त्याविषयी येथील शिवसैनिक व मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये थोडा आनंद, थोडे दु:ख व बराचसा संभ्रम अशा संमिश्र भावना आहेत.
महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने या विजय मेळाव्याला हजेरी लावली तरी दुसरा घटक पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये मात्र या एकत्रीकरणाविषयी साशंकता आहे. या सर्वच भावनांना महापालिका निवडणुकीची पार्श्वभूमी आहे. पुण्यात काही जणांचा कानोसा घेतला असता हे एकत्रीकरण मुंबई महापालिकेसाठी उपयुक्त ठरू शकणारे असले तरी अन्य शहरांमध्ये मात्र महापालिका निवडणुकीसाठी वेगवेगळा परिणाम होण्याची शक्यता असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.
शिव-मन सैनिकांमध्ये आनंदाची भावना अशासाठी आहे ही दुरावलेले बंधू एकत्र आले. तब्बल २० वर्षे ते एकमेकांपासून लांबच नव्हे तर टीकेच्या व्यासपीठावर होते. दोन्ही भावांच्या मागे असणारी मराठी मतांची शक्तीही त्यामुळे विभागली गेली. त्यात शिवसेनेचेही नुकसान झाले व मनसेचा तर काहीच फायदा झाला नाही. आता एकत्र आल्यामुळे मराठी माणूस पुन्हा त्यांच्या मागे उभा राहील, असे दोन्हीकडच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना वाटते.
दु:ख अशासाठी की स्वतंत्रपणे काही करून दाखवण्याची धमक दोन्हीकडे संपणार आहे. जे काही करायचे ते एकमेकांमध्ये वाटूनच करावे लागणार आहे. त्यामध्ये कोणाला काही जास्त तर कोणाला काही कमीही सहन करावे लागणार आहे. प्रामुख्याने महापालिकेच्या जागा वाटपात कोणावर तरी कोणाचे तरी वर्चस्व येणारच आहे. पुन्हा ही भांडणे गुलदस्त्यात ठेवावी लागतील. त्याविषयी जाहीरपणे काहीच बोलता व करताही येणार नाही. कारण तसे झाले तर टीकेची वार होण्याची दाट शक्यता आहे.
संभ्रम अशासाठी की शुक्रवारी झालेल्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी आम्ही यापुढे एकत्रच अशी घोषणा केली असली, तरी राज ठाकरे स्पष्टपणे त्याविषयी काहीच बोललेले नाही. मराठी भाषा, मराठी प्रेम याच मुद्यावर त्यांचा भर होता, तर उद्धव यांनी शिवसेनेत फूट पाडणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्यावर नाव न घेता थेट टीका केली व आता आम्ही गद्दारांना पळवून लावू, अशा भाषेत राजकीय प्रहार केले. निवडणूक एकत्र लढणार, असे स्पष्टपणे तेही बोलले नाहीत, मात्र त्यांचा सूर तोच होता. त्याला राज यांच्याकडून अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही असे दोन्ही पक्षातील काही पदाधिकाऱ्यांचे मत आहे.
शिवसेना सध्या महाविकास आघाडीत आहे. याच आघाडीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) असे दोन पक्ष आहेत. यातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने मेळाव्याला थेट हजेरी लावत आमची या एकत्रीकरणाला काहीच हरकत नाही, असे स्पष्ट केले आहे. मात्र, काँग्रेस पक्ष या मेळाव्यापासून दूरच राहिला आहे. मनसेचे आघाडीत येणे त्यांना मानवणार आहे की नाही याविषयी पक्षाने काहीच भाष्य केलेले नाही. त्यामुळेच काँग्रेस काय निर्णय घेईल याविषयी साशंकता आहे.
शनिवारचा मेळावा हा मराठी माणसांचा उत्सव होता. राज ठाकरे यांनी आवाज उठवला, त्याला उद्धव ठाकरे यांची साथ मिळाली व सरकारला हिंदी सक्तीचा निर्णय मागे घ्यावा लागला. राजकीय गोष्टी अजून अस्पष्ट आहेत, भविष्यात त्यामध्ये स्पष्टता येईल.
- बाबू वागसकर, संपर्क नेते, मनसे , - हेमंत संभुस, राज्य सरचिटणीस, मनसे
काँग्रेसची राजकीय भूमिका आमचे नेते एकत्रित बसून चर्चा करून ठरवतील. मनसेला बरोबर घेणे किंवा न घेणे हा शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचा निर्णय आहे. महाविकास आघाडीत त्यामुळे बेबनाव होण्याचे काही कारण नाही. - मोहन जोशी-प्रदेश उपाध्यक्ष काँग्रेस
शिवसेना काय किंवा मनसे काय.. मराठी भाषेसाठी सुरुवातीपासून आवाज उठवत आली आहे. हा आवाज एकत्रित निघाला व त्यामुळे सरकारला हिंदी भाषा सक्ती मागे घ्यावी लागली. आता राजकीय निर्णय काय घ्यायचा हे नेते ठरवतील, व आम्हाला तो मान्य असेल.
- संजय मोरे, शहरप्रमुख शिवसेना