पुणे : "कुठलीही मोठी गोष्ट डोळ्यासमोर ठेवली तर आमच्यातील वाद खूप किरकोळ आहे. त्यासमोर महाराष्ट्र खूप मोठा आहे. या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी आणि मराठी माणसाच्या अस्तित्वावासाठी आमच्यातील वाद आणि बाकी सगळ्या गोष्टी क्षुल्लक आहेत. त्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं, या गोष्टी कठीण नाहीत, पण प्रश्न फक्त इच्छेचा आहे," असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे अप्रत्यक्षरीत्या युतीसाठी हात पुढे केल्याचे वक्तव्य महेश मांजरेकर यांना दिलेल्या एका मुलाखतीत राज यांनी हे केलं आहे. यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सपकाळ म्हणाले, महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर उद्योग बाहेर जातायेत. महायुती महाराष्ट्राच्या मुळावर कुठेतरी उठलेली आहे आणि महाराष्ट्राचं नुकसान करत आहे. राज ठाकरेंची भूमिका म्हणजे इशारा आहे. राज ठाकरे यांचा भाजपने भ्रमनिरास केला आहे. आम्ही अनेक वर्ष पाहतोय की, अनेक दिवसांपासून भाजप हा महाराष्ट्र धर्माच्या विरोधात आहे. आणि महाराष्ट्राचा हा विचार नुकसान केल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्र धर्माच्या नुकसानाचा जो अर्थ आहे की, शिव शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. वारकरी संप्रदायाचा एक प्रभाव असणारा हा महाराष्ट्र आहे. गाडगे महाराज, तुकडोजी महाराजांचा विचार असणारा हा महाराष्ट्र आहे. आणि या महाराष्ट्रामध्ये सर्वांनी सोबत घेऊन चाललं पाहिजे. हे वाडवडिलांनी आणि आपल्या संस्कृतीने आपल्याला दिलं आहे. मात्र भाजप याठिकाणी आपल्याला संस्कृतीपासून आणि भाषेपासून तोडतेय आणि भाजपचा विचार हा महाराष्ट्राची संस्कृती आणि भाषा नष्ट करण्याच्या अनुषंगाने आहे.
राज ठाकरेंच्या विधानातून तुम्ही स्वागत कराल का या भूमिकेचं? असं विचारले असता सपकाळ म्हणाले, राज ठाकरेंची जी भूमिका आहे. ती त्यांनी दिलेला इशारा आहे. त्यांनी या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. हिंदी भाषा सक्तीचा निर्णय घेतलेला आहे. त्याला राज यांनी विरोध केला. आता राज ठाकरेंनी थेट उद्धव ठाकरेंसोबत युती करण्याचा इशारा दिला आहे. जर त्यांच्याकडून प्रस्ताव आला तर आम्ही मान्य करू. आम्ही भारत जोडोवाले आहोत. आम्ही कुटुंब फोडणारे लोकं नाहीत. आम्ही बाप पळवणारा आमचा विचार नाही. पोरं वळवणारी आमची गॅंग नाही. तर आम्ही भारत जोडोवाले आहोत आणि दोन परिवार एकत्र येत असेल तर त्यामध्ये कुठेही आक्षेप काही हरकत नाही.