Pune Rain: चाकण-तळेगाव महामार्गावर रस्त्यावर अवतरली नदी! खड्ड्यांमधून वाट काढण्यासाठी कसरत
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2023 15:27 IST2023-07-19T15:24:22+5:302023-07-19T15:27:47+5:30
प्रशासनाने रस्त्यांवर पाणी साचणारी ठिकाणे तसेच खड्डे शोधून तेथे उपाययोजना करावी, अशी मागणी वाहनचालक नागरिकांनी केली आहे....

Pune Rain: चाकण-तळेगाव महामार्गावर रस्त्यावर अवतरली नदी! खड्ड्यांमधून वाट काढण्यासाठी कसरत
चाकण (पुणे) :चाकण तळेगाव महामार्गावर अनेक ठिकाणी रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून, ते वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत आहेत. पावसाचे पाणी साचल्याने वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघातांची संख्या वाढू लागली आहे. प्रशासनाने रस्त्यांवर पाणी साचणारी ठिकाणे तसेच खड्डे शोधून तेथे उपाययोजना करावी, अशी मागणी वाहनचालक नागरिकांनी केली आहे.
चाकण-तळेगाव चौकात अनेक ठिकाणी खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. रस्त्याच्या मधोमध तर काही रस्त्याच्या लगतच्या साइडपट्ट्या खूप खोलपर्यंत खचल्या आहेत. चाकण ते खालुंब्रे दरम्यान अनेक ठिकाणी थेट रस्त्यावरच पाणी साचलेले आहे. या मोठमोठ्या खड्ड्यांमध्ये फक्त पाणी दिसत असल्यामुळे वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. वाहनचालकांना खड्डे चुकवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. अनेक वाहने थेट खड्ड्यात आदळत आहेत.
प्रत्येक वर्षी या रस्त्यावर अशीच स्थिती होते. यंदाही अनेक ठिकाणी रस्त्यात मोठमोठे खड्डे पडून त्यात पाणी साचले आहे. रस्त्यावरील तळी पाऊस होऊन गेल्यानंतर पुढे काही दिवस तशीच राहतात. त्यामुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहेत. त्यामुळे प्रशासनाने या पाणी साचणाऱ्या ठिकाणांची तसेच खड्ड्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहनचालकांसह स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
चाकण तळेगाव महामार्गाचे नूतनीकरण करण्यात येणार असल्याने दुतर्फा असलेली अतिक्रमणे एप्रिल-मे महिन्यात हटवण्यात आली होती. मात्र रस्त्याचे काम जैसे थे राहील परंतु तिथे पुन्हा अतिक्रमणे पूर्ववत झाली आहेत. वाढलेली वाहनांची संख्येने सतत वाहतूक कोंडी होत आहे तर अरुंद आणि खड्डेमय जागा अपघातांचे केंद्रबिंदू ठरत आहेत.