दिवाळीत रेल्वेची २८ कोटींची कमाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2019 07:00 IST2019-11-17T07:00:00+5:302019-11-17T07:00:06+5:30
मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पाच कोटींची वाढ

दिवाळीत रेल्वेची २८ कोटींची कमाई
पुणे : दिवाळी तसेच ऑक्टोबर महिन्यातील इतर सण-उत्सवानिमित्त पुणेरेल्वे स्थानकातून सोडण्यात आलेल्या विशेष रेल्वेगाड्यांनी तब्बल २८ कोटी रुपयांची कमाई केली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पाच कोटींची वाढ झाली असून प्रवासी संख्याही ३ टक्क्यांनी वाढली आहे.
रेल्वेकडून दरवर्षी दिवाळी तसेच इतर सण-उत्सवानिमित्त देशभरात विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात येतात. या गाड्यांना प्रवाशांना उत्स्फुर्त प्रतिसाद मिळतो. कमी तिकीट दरामुळे प्रवाशांकडून रेल्वेला अधिक प्राधान्य दिले जाते. त्यामुळे रेल्वेकडूनही प्रवाशांच्या सुविधेसाठी दरवर्षी विशेष रेल्वेगाड्यांमध्ये वाढ केली जात आहे. मागील वर्षी पुणे रेल्वेस्थानकातून पटना, इंदौर, जयपुर, गोरखपुर, अजनी, हजरत निझामुद्दीन यांसह प्रामुख्याने उत्तरेकडील ठिकाणांसाठी १० विशेष गाड्या सोडल्या होत्या. यातील काही गाड्या ऑक्टोबर व नोव्हेंबर तर काही गाड्या केवळ नोव्हेंबर महिन्यात धावल्या. गेल्यावर्षी या गाड्यांमधून सुमारे २३ लाख प्रवाशांनी प्रवास केला. त्यातून रेल्वेला सुमारे २४ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते.
यंदा रेल्वेकडून ऑक्टोबर महिन्यात विशेष गाड्यांमध्ये आठने वाढ करून ही संख्या १८ पर्यंत नेण्यात आली. त्यामध्ये प्रामुख्याने उत्तर भारतात जाणाऱ्या गाड्यांची संख्या अधिक होती. त्यामध्ये जबलपुर, गोरखपुर, संत्रागाची, मंडुआडिह (दोन्ही उत्तरप्रदेश), हजरत निझामुद्दीन, जयपुर, दानापुर (बिहार), लखनौ, इंदौर, भोपाळ, झांसी या ठिकाणांचा समावेश आहे. दिवाळीच्या काळात या गाड्यांच्या प्रत्येकी दोन फेऱ्या झाल्या. तसेच महाराष्ट्रात विदर्भ व मराठवाड्यात जाणाऱ्या प्रवाशांसाठीही नांदेड, नागपुर व बल्लारपुर या विशेष गाड्या सोडण्यात आल्या. या गाड्यांची प्रत्येकी एक फेरी झाली. सर्वच दिवाळी विशेष गाड्यांना प्रवाशांचा प्रतिसाद वाढल्याचे दिसून आले. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा प्रवासी संख्येतही सुमारे ६० हजारांहून अधिक वाढ झाली. यंदा या गाड्यांमधून सुमारे २३ लाख ५० हजार प्रवाशांनी प्रवास केला. त्यातून रेल्वेला सुमारे २७ कोटी ७३ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. विदर्भ, मराठवाड्यात जाणाऱ्या गाड्यांना प्रवाशांनी मोठी गर्दी केल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
---------------
विशेष गाड्यांची स्थिती
२०१८ (ऑक्टो., नोव्हें.) - १० गाड्या
२०१९ (ऑक्टोबर) - १८ गाड्या
------------
प्रवासी संख्या -
२०१८ - २२ लाख ८५ हजार
२०१९ - २३ लाख ५० हजार
-----------
उत्पन्न -
२०१८ - २३ कोटी ८५ लाख
२०१९ - २७ कोटी ७५ लाख