चतुःश्रृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुगार अड्ड्यावर छापा; तब्बल ५ लाखांचा मुद्देमाल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2022 16:19 IST2022-07-14T16:19:39+5:302022-07-14T16:19:53+5:30
गेल्या काही दिवसांपासून सामाजिक सुरक्षा विभागाकडून जुगार धाड सत्र सुरू

चतुःश्रृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुगार अड्ड्यावर छापा; तब्बल ५ लाखांचा मुद्देमाल जप्त
पुणे : चतुःश्रृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शितोळे पेट्रोल पंपाच्या पुढे मोकळ्या जागेत सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला आहे. त्या ठिकाणाहून तब्बल ५.२६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून १७ जणांना अटक करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून सामाजिक सुरक्षा विभागाकडून जुगार धाड सत्र सुरू असल्याने जुगार चालकांनी नविन शक्कल लढवून मोबाईल जुगार सुरू केला आहे. यात जुगार खेळणारे व खेळवणारे हे एखाद्या कारमध्ये, रिक्षात अथवा दुचाकी वर बसून खेळी कडून मटका आकडा, सोरट व रक्कमेची देवाण घेवाण करतात. पोलीस कारवाईची थोडी जरी खबर लागल्यास त्याच गाडीतून पसार होतात. पण आजच्या कारवाईत ज्या चारचाकी व दुचाकी वाहनांववरून घटनास्थळी मोबाईल जुगार खेळला जात होता ती वाहने सुद्धा जप्त करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे सदरचा जुगाराचा अड्डा मागील अनेक वर्षांपासून स्पायसर रोड जवळील औंध सांगवी नदी पुलाच्या अलीकडेच, सुरू होता. गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे, नदीकाठी पाण्याची पातळी वाढल्याने, सदरचा जुगाराचा अड्डा हा तेथेच असलेल्या दर्शन रीव्हर साईड हाॅटेलमध्ये व आसपासचे परिसरात सुरु करण्यात आला होता. या हाॅटेलमध्ये बेकायदेशीर जुगाराबरोबरच विदेशी दारूचा अवैध साठा व विक्री देखील सुरू होती. त्यामुळे जुगार कारवाई बरोबरच दारुबंदी कायद्यानुसारही कारवाई करण्यात येऊन, विदेशी दारुचाही सर्व साठा जप्त करण्यात आलेला आहे.
सदरची कारवाई अमिताभ गुप्ता, मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, संदीप कर्णिक, पोलीस सह आयुक्त, रामनाथ पोकळे, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे व श्रीनिवास घाटगे, पोलीस उपायुक्त, गुन्हे यांचे आदेश व मार्गदर्शनखाली, सामाजिक सुरक्षा विभागाकडील व. पो. नि. राजेश पुराणिक, महीला पोलीस उप निरीक्षक सुप्रिया पंधरकर, मपोह शिंदे, मपोह मोहीते, पोना कांबळे, पोना बरडे, पोना ढापसे यांच्या पथकाने केली आहे.