India vs South Africa Match: पुण्यात क्रिकेट बेटिंगवर छापा; पावणेतीन लाखांचा ऐवज हस्तगत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2022 21:46 IST2022-01-24T21:45:51+5:302022-01-24T21:46:05+5:30
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील एक दिवसीय क्रिकट सामन्यावर खडकीत ऑनलाईन बेटिंग सुरु असल्याचा प्रकार सामाजिक सुरक्षा विभागाने उघडकीस आणला आहे

India vs South Africa Match: पुण्यात क्रिकेट बेटिंगवर छापा; पावणेतीन लाखांचा ऐवज हस्तगत
पुणे : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील एक दिवसीय क्रिकट सामन्यावर खडकीत ऑनलाईन बेटिंग सुरु असल्याचा प्रकार सामाजिक सुरक्षा विभागाने उघडकीस आणला आहे. याप्रकरणी एकाला पोलिसांनी अटक करुन त्याच्याकडून पावणे तीन लाखांचा ऐवज हस्तगत केला आहे. पुनीत चंदनमल जैन (वय ३६, रा. मेहता टॉवर्स, खडकी) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात रविवारी केपटाऊन येथे एकदिवसीय क्रिकेट सामना सुरु होता. खडकी येथील पुनीत जैन हा मोबाइलद्वारे लोटस, क्रिकेट बझ या क्रिकेट बेटिंग मोबाईल ऍपद्वारे ऑनलाईन बेटिंग घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी खडकीमधील नवा बाजार येथील चंदन हँडलुम्स या दुकानावर छापा घातला. तेथे पुनीत जैन हा क्रिकेट स्टेडियममधील बुकीकडुन बेकायदेशीररित्या स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी ऑनलाईन बेटिंग घेत असताना पोलिसांना आढळला. पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे २ लाख ६८ हजार रुपयांची रोख रक्कम, दोन मोबाईल असा २ लाख ७८ हजारांचा माल जप्त केला.
सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक शोभा क्षीरसागर, पोलीस उपनिरीक्षक श्रीधर खडके, श्रीकांत चव्हाण, अण्णा माने यांच्या पथकाने ही कामगिरी केली.