Rahul Solapurkar : राजीनामा देत सोलापूरकरांनी करून घेतली सुटका
By राजू इनामदार | Updated: February 6, 2025 19:52 IST2025-02-06T19:52:15+5:302025-02-06T19:52:55+5:30
दिलगिरींच्या शब्दांवरही शिवप्रेमींची हरकत

Rahul Solapurkar : राजीनामा देत सोलापूरकरांनी करून घेतली सुटका
पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्ऱ्याहून सुटका प्रकरणात अनाठायी वक्तव्य केल्यामुळे अडचणीत आलेले अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी अखेर भांडारकर प्राच्यविद्या संस्थेतील विश्वस्त पदाचा राजीनामा देत स्वत:ची सुटका करून घेतली. त्यांनी व्यक्त केलेल्या दिलगिरीमधील शब्दांवरही शिवप्रेमींनी हरकत घेतल्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला.
संस्थेचे मानद सचिव सुधीर वैशंपायन यांनी चार ओळींचे निवेदन प्रसिद्ध करून साेलापूरकर यांच्या राजीनाम्याचे वृत्त कळवले. सोलापूरकर यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. काही महिन्यांपूर्वी एका पॉडकॉस्ट कार्यक्रमात बोलताना सोलापूरकर यांनी आग्ऱ्याहून सुटका करताना छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या अधिकाऱ्यांना लाच दिली, असे वक्तव्य केले होते. त्यावरून गदारोळ उठला.
शिवप्रेमींनी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), शिवसेना (उद्धव ठाकरे) या राजकीय पक्षांनी सोलापूरकर यांचा निषेध करत आंदोलन केले. तसेच त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यानंतर समाजमाध्यमांद्वारे संदेश प्रसारित करत सोलापूरकर यांनी दिलगिरी व्यक्त केली. त्यातही त्यांनी लाच शब्द वापरण्याची चूक झाली असेच म्हटले. त्यावरून पुन्हा एकदा त्यांच्याविरोधात शिवप्रेमींनी क्षोभ व्यक्त केला. अखेर त्यांनी राजीनामा देत यातून सुटका करून घेतली, असे बोलले जात आहे.