Inspirational Story: पुणेकर युसुफची भन्नाट आयडिया; स्कुटरवर थाटलं पंक्चरचं दुकान
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2022 23:59 IST2022-03-14T20:18:57+5:302022-03-14T23:59:36+5:30
पुण्यातील येरवडा इथं राहणाऱ्या युसूफ शेख या 40 वर्षीय तरुणानं स्कुटर आणि त्यावरचं 'एअर कॉम्प्रेसर' तयार केलंय

Inspirational Story: पुणेकर युसुफची भन्नाट आयडिया; स्कुटरवर थाटलं पंक्चरचं दुकान
शिवानी खोरगडे
पुणे : पुण्यात व्यवसायाला मरण नाही हेच खरं. केव्हा कोण कसा व्यवसाय करेन याचं नवलच करत बसू अशा भन्नाट कल्पना लढवल्या जातात. अशाच एका कल्पनेतून पुण्याच्या रँचोनं चक्क एका स्कुटरवरच दुकान थाटलं आहे. पण दुकान थाटलं म्हणजे हे काय नवीन? चला तर मग बघुयात स्कुटरवरचं हे दुकान आहे काय..? हे जाणून घेऊयात.
पुण्यातील येरवडा इथं राहणाऱ्या युसूफ शेख या 40 वर्षीय तरुणानं एक मशीन तयार केलीये. तेही चक्क स्कुटरवर आहे. युसुफ केवळ तिसरी पास आहे. येरवडा इथल्या फाय नाईन चौकात तो गेल्या 16 वर्षापासून पंक्चर काढण्याचं काम करतो. युसूफ याने स्वतः अभ्यास करून कोणाचीही मदत न घेता स्कुटरवर पंक्चरचं दुकान थाटलंय. त्याने बनविलेल्या या रँचो स्टाईल स्कुटरचा त्याला विना दुकान, विना लाईट फायदा होत आहे. स्कुटरवर दुकान थाटल्यानं ना चार भिंतींच्या दुकानाचं भाडं द्यावं लागतं, ना इलेक्टरीक बिल भरावं लागतं. जितकी कमाई होते तितकी सगळी युसूफचीच असते.
सोळा वर्षांपासून काम करत असताना लाईट नसल्याने तसेच दुकान छोटं असल्याने युसुफला अनेक समस्या येत होत्या. यावर उपाय म्हणून काहीतरी करता येईल का यासाठी युसूफच्या मनात नेहेमी विचार येत होते. 3 वर्षांपूर्वी युसुफच्या मनात एक संकल्पना आली आणि त्याने एक स्कुटर खरेदी केली. आणि त्यावर प्रक्रिया करत पंक्चरचं मशीन तयार केलं आणि त्याद्वारे गेल्या 3 वर्षांपासून येरवड्यातील फाय नाईन चौक इथं स्कुटरवर पंक्चर सुरू असून या रँचो स्कुटरद्वारे युसूफचं दुकान सुरू आहे.
युसूफ शेख हे तिसरी पर्यंत शिकलेले असून त्यांना ऑटोमोबाईल क्षेत्राचा काहीच अनुभव नाही. पण तरीही युसूफ यांनी ऑटोमोबाईल क्षेत्राला लाजवेल अशी स्कुटर आणि त्यावरचं 'एअर कॉम्प्रेसर' तयार केलंय. युसूफ यांनी जी स्कुटर बनवली आहे, त्यात त्यांनी स्कुटरची पेट्रोलची टाकी काढली आणि त्यावर पंक्चर मशीन बसवली आहे. एका चाकाची हवा भरण्यामागे मागे 2 रुपये मिळत असल्याचं यावेळी युसूफ यांनी सांगितलं.