Pune ZP| जिल्हा परिषद गटांवर सर्वाधिक हरकती दौंड तालुक्यातून
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2022 14:25 IST2022-08-03T14:22:02+5:302022-08-03T14:25:07+5:30
आरक्षण सोडतीवर हरकतींचा पाऊस...

Pune ZP| जिल्हा परिषद गटांवर सर्वाधिक हरकती दौंड तालुक्यातून
पुणे :जिल्हा परिषद गट व गणांच्या आरक्षण सोडतीमध्ये बारामीत तालुक्यात दोन गटांमध्ये आरक्षणाची चूक लक्षात आल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी फेरसोडतीला परवानगी देण्यासाठीचा प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविला आहे. त्याला अद्याप परवानगी मिळालेली नसली तरी या आरक्षण सोडतीवर हरकतींचा पाऊस पडला आहे. गटांसाठी तब्बल ९१ हरकती, तर गणांसाठी १३ हरकती आल्या आहेत. आता फेरसोडतीला परवानगी मिळते की हरकतींवर सुनावणी होते याकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे.
गट आणि गणांच्या आरक्षणावर हरकत घेण्यासाठी मंगळवारी अंतिम मुदत होती. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात नागरिकांची रिघ लागली होती. जिल्हा परिषद गटांसाठी ९१, तर पंचायत समिती गणांवर १३ अशा एकूण १०४ हरकती दाखल झाल्या आहेत. त्यातील गटांबाबत सर्वाधिक ३० हरकती दौंड तालुक्यातून आल्या आहेत. त्यानंतर खेड तालुक्यातून १५ हरकती आल्या आहेत. त्या खालोखाल १० हरकती बारामती तालुक्यातून आल्या आहेत. शिरूर ७, आंबेगाव, मावळ, हवेली प्रत्येकी ४, इंदापूर ३, जुन्नर २; तर मुळशी पुरंदर प्रत्येकी हरकती आल्या आहेत. वेल्हे व भोर तालुक्यातून एकही हरकत आलेली नाही.
पंचायत समितीच्या गणांवर मुळशी तालुक्यातून सर्वाधिक ६ हरकती आल्या आहेत. दौंडमधून ५ तर खेड, हवेलीमधून प्रत्येकी १ हरकत आली आहे. उर्वरित तालुक्यांतून एकही हरकत आलेली नाही.
जिल्हा परिषदेचे ८२ गट तर १६४ पंचायत समिती गण आहेत. बारामती तालुक्यात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या प्रवर्गातील आरक्षण चक्रकार पद्धतीने लोकसंख्या निकषावर निश्चित केले जाते. परंतु गटांच्या आरक्षण प्रक्रियेत चूक झाल्याची माहिती समोर आली. त्यामुळे जिल्हा परिषदेची आरक्षण फेरसोडत काढण्याची परवानगी द्यावी, असा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाने राज्य निवडणूक आयोगाकडे मागितला आहे.