Pune ZP Election Result 2026: कुरुळी-आळंदी ग्रामीण जिल्हा परिषद व पंचायत समितीत उद्धव सेनेचा दणदणीत विजय
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 12:43 IST2026-02-10T12:42:09+5:302026-02-10T12:43:49+5:30
या लढतीत उद्धव सेनेच्या कु. गौरी चंदन मुऱ्हे यांनी मतदारांचा विश्वास संपादन करत ५,२१३ मते मिळवत बाजी मारली.

Pune ZP Election Result 2026: कुरुळी-आळंदी ग्रामीण जिल्हा परिषद व पंचायत समितीत उद्धव सेनेचा दणदणीत विजय
कुरुळी : कुरुळी-आळंदी ग्रामीण जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणातील बहुचर्चित आणि अत्यंत चुरशीच्या निवडणुकांचा निकाल अखेर जाहीर झाला असून, या निकालात उद्धव सेनेने मोठा विजय मिळवत परिसरातील राजकीय वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. जिल्हा परिषद गटात उद्धव सेनेच्या विनया सुधीर मुंगसे यांनी तब्बल १३,९०६ मते मिळवत दणदणीत विजय मिळवला. या निवडणुकीत सर्वच प्रमुख पक्षांनी ताकदीचे उमेदवार मैदानात उतरवल्याने प्रचाराच्या काळात संपूर्ण परिसराचे राजकीय वातावरण तापले होते. प्रचाराच्या धामधुमीनंतर मतमोजणीच्या दिवशी सर्वांचे लक्ष थेट निकालाकडे लागले होते.
कुरुळी–आळंदी ग्रामीण जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या शीतल आशिष येळवंडे, शिवसेना (ठाकरे गट) यांच्या विनया सुधीर मुंगसे आणि भारतीय जनता पार्टीच्या कल्पना पाटीलबुवा गवारी यांच्यात अटीतटीची तिरंगी लढत रंगली होती. मात्र, मतदारांनी ठाकरेंच्या शिवसेनेवर विश्वास टाकत विनया मुंगसे यांना स्पष्ट आणि मोठे मताधिक्य दिले. या विजयामुळे उद्धव सेनेचा या भागातील प्रभाव अधिक बळकट झाला आहे. कुरुळी पंचायत समिती गणातही तितकीच चुरस पाहायला मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या सुरेखा राहुल गवारी, शिवसेना (शिंदे गट) यांच्या तनुजा नीलेश पवार आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्यात तिरंगी सामना झाला. या लढतीत उद्धव सेनेच्या कु. गौरी चंदन मुऱ्हे यांनी मतदारांचा विश्वास संपादन करत ५,२१३ मते मिळवत बाजी मारली.
आळंदी ग्रामीण पंचायत समिती गणात मात्र थेट सामना रंगला होता. येथे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांचे निखिल थोरवे यांनी शिवसेना (ठाकरे गट) यांचे काळुराम थोरवे यांना मागे टाकत ७,०७५ मते मिळवत विजय संपादित केला. या निकालामुळे कुरुळी–आळंदी ग्रामीण भागातील राजकीय समीकरणे बदलण्याचे संकेत मिळाले असून, विशेषतः उद्धव सेनेने जिल्हा परिषद व पंचायत समिती पातळीवर आपले स्थान अधिक मजबूत केले आहे. विजयानंतर उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला, तर पराभूत उमेदवारांनी निकाल स्वीकारत पुढील वाटचालीसाठी तयारी सुरू केली आहे.