Pune ZP Election Result 2026 : आंबेगावमध्ये राष्ट्रवादीचा दबदबा कायम; विवेक वळसे पाटील, विष्णूकाका हिंगे पाटील यांचा दणदणीत विजय
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 16:18 IST2026-02-09T16:17:39+5:302026-02-09T16:18:39+5:30
आंबेगावच्या पूर्व भागात राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद उमेदवार विवेक वळसे पाटील, विष्णू काका हिंगे विजयी

Pune ZP Election Result 2026 : आंबेगावमध्ये राष्ट्रवादीचा दबदबा कायम; विवेक वळसे पाटील, विष्णूकाका हिंगे पाटील यांचा दणदणीत विजय
अवसरी (आंबेगाव): आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागात झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांनी राजकीय वातावरण तापवले होते. अत्यंत चुरशीच्या आणि अटीतटीच्या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसने आपला दबदबा कायम राखत महत्त्वाचे गट जिंकले आहेत.
पारगाव जारकरवाडी जिल्हा परिषद गटातून माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे पुतणे विवेक वळसे पाटील यांनी तब्बल २,९६७ मतांच्या फरकाने विजय मिळवला. तर अवसरी-पिंपळगाव जिल्हा परिषद गटात विष्णूकाका हिंगे पाटील यांनी ६०५ मतांनी प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत यश संपादन केले.
या विजयाची घोषणा होताच अवसरी परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करत फटाक्यांची आतषबाजी केली. “राष्ट्रवादीचा किल्ला अबाधित” अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला.
पंचायत समिती निवडणुकीतही राष्ट्रवादीने आघाडी घेतली आहे. अवसरी गणातून नीलेश नामदेव टेमकर यांनी २,९०० मतांच्या फरकाने, तर पिंपळगाव गणातून शिवाजी संपत निघोट यांनी ५१४ मतांनी विजय मिळवला.
याशिवाय जारकरवाडी पंचायत समिती गणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंकिता अनिल वाळुंज, तर पारगाव गणातून राष्ट्रवादी (शरद पवार गट)च्या श्वेता किरण ढोबळे या विजयी झाल्या आहेत.
या निकालांमुळे आंबेगाव तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची राजकीय ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली असून आगामी स्थानिक राजकारणात या विजयाचा मोठा प्रभाव दिसून येण्याची शक्यता आहे.