पुणे : राज्यात जिल्हा परिषदांच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या असून, त्यात पुणे जिल्हा परिषदेचीही निवडणूक होणार आहे. जिल्ह्यात ७३ गट व १४६ गण असून सर्वाधिक १६ गण जुन्नर, खेड व इंदापूर या तीन तालुक्यांमध्ये आहेत. जिल्ह्यात सुमारे ३० लाख मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार असून ३ हजार ६०५ मतदान केंद्रांवर मतदान घेतले जाणार आहे. यासाठी २३ हजार ५४५ मतदान कर्मचारी व अधिकारी तैनात करण्यात येणार असून सर्व १३ तालुक्यांसाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.
राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार पुणे जिल्ह्यात १६ जानेवारीपासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. मतदान ५ फेब्रुवारी रोजी होणार असून मतमोजणी ७ फेब्रुवारीला होईल. जिल्ह्यात एकूण ७३ गट वर १४६ गण आहेत. एकूण गटांमध्ये अनुसूचित जातीसाठी ७, अनुसूचित जमातीसाठी ५ नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी १६ तर सर्वसाधारण ४२ गट असतील. सर्वाधिक १६ गण जुन्नर, खेड व इंदापूर या तालुक्यांमध्ये असून प्रत्येकी १४ गण शिरूर व दौंड तालुक्यात आहेत. हवेली व बारामती तालुक्यात प्रत्येकी १२ गण असून आंबेगाव व मावळ येथे १० पुरंदरमध्ये ८ तर मुळशीत ६ व सर्वात कमी ४ गण वेल्ह्यात आहे. त्यात अनुसूचित जातींसाठी १५ अनुसूचित जमातींसाठी ८ नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी ३४ तर सर्वसाधारण ८९ गण असतील.
जिल्ह्यात या निवडणुकीसाठी २९ लाख ७६ हजार ४५४ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यात १५ लाख २६ हजार ९८६ पुरुष, १४ लाख ४९ हजार ३७३ महिला तर ९५ इतर मतदार असतील. सर्वाधिक मतदार इंदापूर तालुक्यात असून येथे ३ लाख २१ हजार दोन मतदार मतदान करू शकतील. त्याखालोखाल जुन्नर तालुक्यात ३ लाख ७ हजार २२३ मतदार असतील. शिरूर तालुक्यात ३ लाख १ हजार ९५६ मतदार पात्र ठरले आहेत.
जिल्ह्यात एकूण ३६०५ मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहेत. त्यासाठी ७ हजार ९३१ मतदान यंत्र (ईव्हीएम) तर ३ हजार ९६६ कंट्रोल युनिट असतील. जिल्हा प्रशासनाने या निवडणुकीसाठी एकूण २३ हजार ५४५ अधिकारी व कर्मचारी नेमले आहेत. त्यात प्रत्येकी ४ हजार ७०९ केंद्राध्यक्ष तसेच पहिले, दुसरे, तिसरे मतदान अधिकारी तसेच शिपाई असतील.
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सर्व तेरा तालुक्यांसाठी निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक अधिकारी यांची नेमणूक केली आहे. तसेच जिल्हास्तरावर १२ समन्वय अधिकाऱ्यांची देखील नेमणूक केली आहे. तसेच सर्व १३ तालुक्यांच्या ठिकाणी अर्ज स्वीकृती व छाननीचे ठिकाण व मतमोजणीचे ठिकाणही जाहीर करण्यात आले आहे.
Web Summary : Pune Zilla Parishad election set for February 5th, with 30 lakh voters across 73 groups and 146 subgroups. Over 23,000 officials will oversee 3,605 polling centers. Filing starts January 16th; counting on February 7th.
Web Summary : पुणे जिला परिषद चुनाव 5 फरवरी को; 73 समूहों और 146 उपसमूहों में 30 लाख मतदाता। 23,000 से अधिक अधिकारी 3,605 मतदान केंद्रों की निगरानी करेंगे। 16 जनवरी से नामांकन शुरू; मतगणना 7 फरवरी को।