Pune ZP : ग्रामीण शिक्षणाला नवी दिशा...! पुणे जिल्हा परिषदेची पहिली इंग्रजी माध्यमाची आंतरराष्ट्रीय शाळा सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 13:01 IST2026-04-10T13:01:35+5:302026-04-10T13:01:45+5:30
- पुणे जिल्हा परिषदेची ही पहिली इंग्रजी माध्यमाची आणि केंद्रीय बोर्डावर आधारित ग्रामीण भागातील आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा ठरणार आहे.

Pune ZP : ग्रामीण शिक्षणाला नवी दिशा...! पुणे जिल्हा परिषदेची पहिली इंग्रजी माध्यमाची आंतरराष्ट्रीय शाळा सुरू
पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचा ड्रीम प्रोजेक्ट ठरलेली पुरंदर तालुक्यातील खानवडी येथील ‘ज्योती सावित्री जिल्हा परिषद शाळा’ अखेर प्रत्यक्षात साकारत असून, येत्या ११ एप्रिल रोजी या शाळेची पहिली घंटा वाजणार आहे. जिल्हा परिषदेची ही पहिली इंग्रजी माध्यमाची आणि केंद्रीय बोर्डावर आधारित ग्रामीण भागातील आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा ठरणार आहे.
या शाळेच्या उद्घाटनाची घोषणा जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी पत्रकार परिषदेत केली. यावेळी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत वाघमारे, आदी उपस्थित होते. महात्मा जोतिबा फुले यांच्या १९९व्या जयंतीनिमित्त आणि त्यांच्या २००व्या जयंती वर्षाच्या प्रारंभदिनी हा सोहळा पार पडणार असल्याचे जगदाळे यांनी सांगितले.
या शाळेत बालवाडी ते इयत्ता बारावीपर्यंत सीबीएसई अभ्यासक्रमावर आधारित शिक्षण दिले जाणार आहे. डिजिटल शिक्षणपद्धती, सुसज्ज प्रयोगशाळा, आधुनिक ग्रंथालय, क्रीडा सुविधा यांसह विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर देण्यात आला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी खानवडी येथे सुमारे १२ एकर गायरान जमीन राज्य सरकारने जिल्हा परिषदेला वर्ग केली आहे.
या शाळेमुळे परिसरातील दारिद्र्यरेषेखालील विद्यार्थ्यांना दर्जेदार अनिवासी शिक्षणाची संधी मिळणार आहे. तसेच, जिल्ह्यातील हुशार व गरजू विद्यार्थ्यांसाठी सहावीपासून निवासी सुविधा उपलब्ध करून देण्याची योजना आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून शाळेची सुरुवात होत असून, पहिल्या टप्प्यात बालवाडी ते इयत्ता दुसरीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. या टप्प्यात सुमारे २६० विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले असून, ही व्यवस्था पूर्णतः अनिवासी असेल. पुढील वर्षापासून इयत्ता सहावीपासून निवासी शाळा सुरू करण्याचे नियोजन आहे. या शाळेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून, उपमुख्यमंत्री तसेच राज्यातील अनेक मंत्री या सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तापूर्ण आणि आधुनिक शिक्षणाची नवी दारे उघडणारा हा प्रकल्प ठरणार आहे.