पुणे जिल्हा परिषदेने तातडीने भरली १८८ वैद्यकीय अधिका-यांची पदे
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2020 20:26 IST2020-04-19T20:21:06+5:302020-04-19T20:26:24+5:30
पुण्याजवळील ग्रामीण भागात काेराेनाचा प्रसार हाेत असल्याने जिल्हा परिषदेने तातडीने वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे भरली आहेत.

पुणे जिल्हा परिषदेने तातडीने भरली १८८ वैद्यकीय अधिका-यांची पदे
पुणे : ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन जिल्हा परिषदेने वैद्यकीय अधिका-यांची तातडीने भरती केली आहे. जिल्हा परिषदेची जवळपास १८८ समुदाय आरोग्य अधिका-यांची पदे रिक्त होती. या सर्व पदांवर भरती करण्यात आली आहे. या सर्वांना जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात नियुक्ती देण्यात आली असल्याचे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी सांगितले.
जिल्ह्यात कोरोनाच्या रूग्णात वाढ होत आहे. कोरोनाचा हा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी रुग्ण सेवा आणि सर्वेक्षण यासाठी वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचा-यांची कमतरता आरोग्य विभागाला भासत होती. ग्रामपातळीवरील सर्वेक्षण जनजागृती त्याचप्रमाणे कोरोनाचे लक्षणे आढळणा-या रुग्णांची तपासणी करण्यासाठी अधिकारी आणि कर्मचा-यांची गरज लक्षात घेता तातडीने १८८ रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या नुसार ही पदे भरली असून समुदाय आरोग्य अधिका-यांच्या मदतीने फ्ल्यू क्लिनिक सुरू करणे, कोरोना विषाणू संसगार्चा रूग्ण सापडलेल्या भागाचे सर्वेक्षण करणे, संशयित रुग्णांना लक्षणानुसार होम किंवा इन्स्टियूशनल क्वरांटाईन करणे आणि गरज भासल्यास संशयितांना रुग्णालयात दाखल करण्याची शिफारस करणे आदी कामे केली जाणार आहेत. जिल्ह्यात ९७ प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. या केंद्रांमध्ये १८८ वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. शिवाय ५३७ आरोग्य उपकेंद्र आहेत. यापैकी १८८ उपकेंद्रांना समुदाय आरोग्य अधिकारी मिळाले आहेत.
तालुकानिहाय भरती केलेले वैद्यकीय अधिकारी
आंबेगाव - १३, बारामती आणि भोर - प्रत्येकी १५, दौंड - १८, हवेली - २३, इंदापूर आणि पुरंदर - प्रत्येकी ९, जुन्नर - २६, खेड - १९, मावळ - १२, मुळशी - ८, शिरूर - १४ आणि वेल्हे - ७