आळंदी : खेड तालुक्यात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमुळे सध्या जोरदार राजकीय उलथापालथ सुरू आहे. विशेषतः आरक्षणाची सोडत जाहीर झाल्यानंतर अनेक प्रस्थापित पुरुष इच्छुकांनी ''प्लॅन बी'' म्हणून आपल्या पत्नींना मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे या निवडणुकीत अचानक ''सौभाग्यवती'' मॉडेलचा बोलबाला वाढला असून, अनेक मतदारसंघांचे राजकीय समीकरण पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे.
जिल्हा परिषद गटात आणि पंचायत समिती गणात अपेक्षित आरक्षण न पडल्यामुळे, जे नेते स्वतः निवडणूक लढवण्यासाठी सज्ज होते. त्यांना आता नाइलाजाने माघार घ्यावी लागली आहे. मात्र, सक्रिय राजकारणातून बाहेर न जाता, त्यांनी आपल्या शिक्षित आणि अनुभवी पत्नींना उमेदवारी देऊन अप्रत्यक्षपणे निवडणुकीच्या रिंगणात कायम राहण्याचा मार्ग स्वीकारला आहे. ''नवख्या'' महिला उमेदवारांच्या निमित्ताने आता तालुक्यातील अनेक ''पडद्याआड'' चालणारे राजकारण थेट लोकांसमोर येण्याची चिन्हे आहेत. यामुळे प्रस्थापित नेत्यांना आता आपल्या पत्नीच्या माध्यमातून जनसंपर्क आणि विकासकामांची पुन्हा एकदा परीक्षा द्यावी लागणार आहे.
या निवडणुकीत केवळ प्रस्थापितांच्याच नव्हे, तर युवा पिढीतील नव्या महिला चेहऱ्यांची संख्याही लक्षणीयरीत्या वाढली आहे. सदरचे तरुण चेहरे पारंपरिक राजकारणाऐवजी, सोशल मीडिया आणि घरोघरी गाठीभेटी यावर जास्त भर देत आहेत. त्यांच्या अजेंड्यावर मूलभूत समस्या, वाढती वाहतूककोंडी आणि बेरोजगारी यांसारख्या स्थानिक समस्या अग्रक्रमाने दिसत आहेत. एकीकडे महाविकास आघाडी आणि महायुतीला बेरजीची समीकरणे जुळवताना दिसत आहे. दरम्यान राष्ट्रवादी (अजित पवार गट), राष्ट्रवादी (शरद पवार गट), उद्धवसेना, शिंदेसेना, भाजप, काँग्रेस, मनसे यांसह इतर पक्षांतील नेतेही जोरदार तयारीला लागले आहेत. अनेकांनी मतदारांना ''देवदर्शनाच्या ट्रिप'', तसेच महिलांसाठी होममिनिस्टर कार्यक्रम घेतले जात आहेत. दरम्यान तालुक्यातून जिल्हा स्तरावर चार, तसेच पंचायत समितीच्या माध्यमातून तालुकास्तरावर आठ महिला नेतृत्व करणार आहेत.
गटातील लढत होणार हायहोल्टेज
शेलपिंपळगाव - मरकळ गटाकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. या हायव्होल्टेज गटात माजी आमदार दिलीप मोहिते पाटलांचा बालेकिल्ला भेदण्यासाठी आमदार बाबाजी काळे यांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. या गटात अध्यक्षा निर्मला पानसरे, सभापती ॲड. विजय शिंदे, सरपंच शरदराव मोहिते, डॉ. शैलेश मोहिते, जनसेवक श्रीनाथ लांडे, ॲड. सर्जेराव पानसरे, बाप्पुसाहेब थिटे अशा दिग्गजांनी तयारी सुरू केली आहे. शेलपिंपळगाव पंचायत समिती गणात माजी सरपंच विद्या सयाजीराजे मोहिते, रोहिणी धैर्यशील पानसरे, आश्विनी संजय मोहिते तयारी करत आहेत. तर मरकळ गणात अड. विशाल झरेकर, सतीश भाडळे, मारुती बवले, योगेश पठारे, अजय टेंगले, भगवान लोखंडे, प्रसाद घेणंद इच्छुक आहेत. सदरचा जि. प. गट तालुक्याच्या राजकारणाची दिशा ठरवणारा ठरू शकतो, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
- गटानुसार जि. प. आरक्षण -
वाडा : अनु.जमाती
कडूस : ना.मा.प्रः महिला
रेटवडी : सर्वसाधारण महिला
शेलपिपळगाव : सर्वसाधारण
मेदनकरवाडी : ना.मा.प्र
पाईट : सर्वसाधारण महिला
नाणेकरवाडी : सर्वसाधारण
कुरुळी : सर्वसाधारण महिला
- पंचायत समिती गणांचे आरक्षण -
वाडा : अनुसूचित जमाती महिला
वाशेरे : अनुसूचित जमाती
कडुस : सर्वसाधारण
चास : सर्वसाधारण महिला
वाफगाव : सर्वसाधारण
रेटवडी : सर्वसाधारण
शेलपिंपळगांव : सर्वसाधारण महिला
मरकळ : सर्वसाधारण
मेदनकरवाडी : ना.मा. प्र.
काळूस : ना.मा. प्र.
पाईट : ना. मा. प्र. महिला
आंबेठाण : सर्वसाधारण महिला
महाळूगे : सर्वसाधारण महिला
नाणेकरवाडी : अनुसूचित जाती महिला
कुरूळी : ना.मा.प्र. महिला
आळंदी ग्रामीण : सर्वसाधारण