In Pune, you get 3,000 rupees for 2 lakh fake notes, two are arrested | पुण्यात ३० हजार रुपयांत मिळतात १ लाखांच्या बनावट नोटा, दोघांना अटक
पुण्यात ३० हजार रुपयांत मिळतात १ लाखांच्या बनावट नोटा, दोघांना अटक

पुणे : नोटबंदीनंतर २ हजार, पाचशे रुपयांच्या नवीन नोटा बाजारात आल्या. यांच्या बनावट नोटा तयार करता येणार नाही, असा दावा केला जात होता. पण, पुण्यासारख्या शहरात चक्क ३० हजार रुपये दिले की १ लाख रुपयांच्या बनावट नोटा मिळत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे या नोटा कोंढव्यातील उंड्री भागात तयार केल्या जात असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे़  होंडा सिटी या अलिशान कारमधून बनावट नोटा घेऊन जाणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या खंडणी व अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. तून हा प्रकार उघडकीस आला आहे.

शुभम दिलीप क्षीरसागर (वय २४, रा़ स्वप्नपूर्ती बंगला, लोणंद, ता़ डाळा, जि़ सातारा) आणि राहुल दिनकर वचकल (वय १९, रा़ वीर, फुलेनगर, ता. पुरंदर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत़ शुभम याच्याकडून ५०० रुपयांच्या ८० बनावट नोटा आणि राहुल वचकल याच्याकडून २ हजार रुपयांच्या ३ व १०० रुपयांची एक बनावट नोट तसेच मोटारीच्या डॅश बोर्डच्या कप्प्यात २०० रुपयांच्या ९२ बनावट नोटा आढळून आल्या़ पोलिसांनी त्यांच्याकडून मोटारीसह ५ लाख ६४ हजार ५०० रुपयांचा माल जप्त केला आहे. गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते व त्यांचे सहकारी रविवारी गस्त घालत असताना  पोलीस कर्मचारी निलेश शिवतरे व रमेश चौधर यांना बनावट नोटा वितरित करण्यासाठी घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली़ त्यानुसार भवानी पेठेतील पदमजी पार्क येथे पोलिसांनी दोघांना पकडले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केल्यावर ते भवानी पेठेतील व्यापाऱ्यांना या नोटा वितरित करण्यासाठी आल्याचे त्यांनी सांगितले़ त्यांना ३० हजार रुपये दिले की १ लाख रुपयांच्या बनावट नोटा मिळत होत्या़ या नोटा अगदी उभेउभ तयार करण्यात आल्या आहेत. सामान्यांना खऱ्या व बनावट नोटांमध्ये फरक आढळून येणार नाही. इतक्या त्या तंतोतंत बनविण्यात आल्या आहेत. या दोघांकडे पोलिसांनी चौकशी केल्यावर त्यांना कोंढवा येथील निदीश कळमकर यांच्याकडून मिळाल्याचे त्यांनी सांगितले़ पोलिसांनी त्याचा शोध घेतला पण तो मिळून आला नाही. ही कामगिरी पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते, उपनिरीक्षक निखिल पवार, आनंद रावडे, पोलीस कर्मचारी निलेश शिवतरे, रमेश चौधर, उदय काळभोर, प्रमोद मगर, महेश कदम, मनोज शिंदे, हनुमंत गायकवाड, फिरोज बागवान, सुमित ताकपेरे यांनी केली आहे. 

 


Web Title: In Pune, you get 3,000 rupees for 2 lakh fake notes, two are arrested
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.