ॲम्बुलन्स, स्कूल बस अग्निशमन दलाची गाडीही अडकली;रस्ता अडवून इंदुरीकर महाराजांचा कार्यक्रम घेणाऱ्या आयोजकांवर कारवाई होणार का?
By किरण शिंदे | Updated: December 13, 2025 20:11 IST2025-12-13T20:09:17+5:302025-12-13T20:11:27+5:30
संपूर्ण परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली. रुग्णवाहिका, स्कूल बस, अग्निशमन दलाचे वाहन आणि इतरही शेकडो वाहन या वाहतूक कोंडीत तीन तास अडकून पडली होती.

ॲम्बुलन्स, स्कूल बस अग्निशमन दलाची गाडीही अडकली;रस्ता अडवून इंदुरीकर महाराजांचा कार्यक्रम घेणाऱ्या आयोजकांवर कारवाई होणार का?
पुणे - पुण्यात वाहतुकीचा प्रश्न बिकट आहे. अरुंद रस्ते आणि त्यात वाहनांची संख्या प्रचंड त्यामुळे अनेकदा वाहतूक कोंडी होत असते. मात्र शुक्रवारी पुण्यात इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनामुळे ३ तास वाहतूक ठप्प झाली होती. काळेपडळ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील श्रीराम चौकात इंदुरीकर महाराजांचे कीर्तन ठेवण्यात आलं, आणि यासाठी वाहतूक विभागाची कोणतीही परवानगी न घेता संपूर्ण रस्ता बंद ठेवण्यात आला होता. त्याचा परिणाम असा झाला की, या संपूर्ण परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली. रुग्णवाहिका, स्कूल बस, अग्निशमन दलाचे वाहन आणि इतरही शेकडो वाहन या वाहतूक कोंडीत तीन तास अडकून पडली होती.
पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला या वाहतूक कोंडी संदर्भातले कॉल केले. त्यानंतर त्या ठिकाणी दाखल झाले काळेपडळ वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण जाधव. वाहतुकीची कोंडी झाल्यामुळे आधीच त्यांचा पारा चढला होता. आणि त्याला कारणीभूत समोर कीर्तनाचा कार्यक्रम असल्याचं लक्षात येताच त्यांनी आयोजकांना धारेवर धरलं. कुणाच्या परवानगीने तुम्ही रस्ता बंद केला असा प्रश्न त्यांनी विचारला. इतकंच नाही तर कीर्तन करणाऱ्या इंदुरीकर महाराजांनाही त्यांनी महाराज कार्यक्रम बंद करा असं सांगितलं. पोलीस अधिकाऱ्यांचा हा रुद्रावतार पाहून इंदुरीकर महाराजांनी काही काळासाठी कीर्तन थांबवलं. आणि त्यानंतर पोलीस अधिकारी प्रवीण जाधव यांनी हातात माईक घेत वाहतुकीची कोंडी कशी झाली हे उपस्थित लोकांना पटवून दिलं. आणि रस्ता रिकामा करण्यासाठी सांगितलं. तोपर्यंत आयोजक त्या ठिकाणी आले. पोलीस आणि आयोजकांमध्ये शाब्दिक चकमकही झाली.
काळेपडळ वाहतूक विभागाचे प्रभारी अधिकारी असलेले प्रवीण जाधव यांनी सांगितले की,आयोजकांनी वाहतूक विभागाची अथवा स्थानिक पोलिस स्टेशनची परवानगी न घेता कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यांच्या कार्यक्रमाविषयी कोणालाही कल्पना नव्हती. श्रीराम चौकातील संपूर्ण रस्ता बंद करून हा कार्यक्रम सुरू होता. त्यामुळे सायंकाळी ५:३० ते रात्री ९ पर्यंत या संपूर्ण परिसरात वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती. या परिसरातील रस्ते जाम झाल्याचे मला अनेक नागरिकांनी फोन करून सांगितले. त्यामुळे त्या ठिकाणी जाऊन मी आयोजकांना कार्यक्रम थांबवण्यास सांगितले. कार्यक्रम आठ वाजता संपल्यानंतर साडेनऊ पर्यंत वाहतुकीची कोणी तशीच होती. परवानगी न घेता कार्यक्रमाचे आयोजन केल्यामुळे आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशा आशयाचं पत्र मी काळेपडळ पोलिसांना लिहिल्याचे जाधव यांनी सांगितले.