Pune Water Supply : पालकमंत्र्याच्या नियुक्ती अभावी रखडले पाणी वाटपाचे नियोजन

By राजू हिंगे | Updated: December 10, 2024 16:49 IST2024-12-10T16:49:07+5:302024-12-10T16:49:54+5:30

पुणे शहराला खडकवासला धरण साखळीतुन पाणी पुरवठा केला जात आहे.

Pune Water Supply distribution planning stalled due to lack of appointment of Guardian Minister | Pune Water Supply : पालकमंत्र्याच्या नियुक्ती अभावी रखडले पाणी वाटपाचे नियोजन

Pune Water Supply : पालकमंत्र्याच्या नियुक्ती अभावी रखडले पाणी वाटपाचे नियोजन

पुणे : राज्यमंत्री मंडळाचा विस्तार १४ डिसेंबर रोजी होण्याची शक्यता आहे. त्यानंतर पालकमंत्र्यांची नियुक्ती केली जाणार आहे. त्यामुळे पालकमंत्री नियुक्तीच्या सर्व प्रकियेला एक आठवडयापेक्षाही जास्त कालावधी लागणार आहे. त्यामुळे पालकमंत्री नसल्यामुळे कालवा समितीची बैठक होणार नाही. त्यामुळे पाणी वाटपाचे नियोजन रखडले आहे.

पुणे शहराला खडकवासला धरण साखळीतुन पाणी पुरवठा केला जात आहे. पुणे महापालिकेने 23.34 टीएमसी पाणीसाठा आरक्षित करण्याची मागणी केली आहे. तथापि, जलसंपदा विभागाने महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या मापदंडानुसार 12.82 टीएमसी पाणीवापर मंजूर केले आहे. प्रत्यक्षात पालिकेकडून वार्षिक सुमारे 17 टीएमसी इतके पाणी उचलले जात असल्याचा जलसंपदा विभागाचा दावा आहे.

धरणातून पाण्याचा वाढीव कोटा मंजूर करण्याचे सर्वस्वी अधिकार हे राज्य शासनाला आहे, मात्र याकडे दुर्लक्ष होत असून मागील दहा वर्षांपासून फक्त आश्वासनांचा पाऊसच पुणेकरांच्या पदरी पडत आहे .

राज्यसरकारने पाण्याचे प्राधान्यक्रम ठरविला आहे. यामध्ये पिण्याच्या पाण्याला पहिले प्राधान्य देण्यात आले आहे. त्यानंतर शेती आणि उद्योग असा प्राधान्यक्रम ठरला आहे. खडकवासला प्रकल्पातील पाणी पुणे शहराला पिण्यासाठी वापरले जाते. तसेच दौंड, इंदापूर आणि बारामती या तीन तालुक्यांसाठी पिण्यासाठी आणि शेतीसाठी सोडण्यात येते. शहराला पिण्यासाठी आवश्यक पाणी, शेतीसाठी आवर्तने, बाष्पीभवन, काही ग्रामपंचायती आदींचा विचार करून पाण्याचे नियोजन आतापासून करण्याची गरज आहे. मागील काही वर्षांपासून पावसाचे आगमन उशीरा होत असल्याचे दिसून येते. जून महिन्यापर्यंत समाधानकारक पाऊस पडत नाही. त्यामुळे धरणात अपेक्षित असा पाणीसाठा उपलब्ध होत नाही. त्यामुळे जून महिन्यातही पाणी कपातीची टांगती तलवार कायम राहते.

साधारणपणे ऑक्टोबरमध्ये होत असलेल्या कालवा समितीच्या बैठकीत पाणी वाटपावर चर्चा होते. 15 ऑक्टोबरला धरणात उपलब्ध असलेला पाणीसाठा विचारात घेऊन पिण्यासाठी आणि शेतीसाठी नियोजन करण्यात येते. यावर्षी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्याने कालवा समितीची बैठक झाली नाही. आता राज्यात सत्तास्थापना झाली असून पाणी नियोजनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पालिकेचे पंपिंग स्टेशन जलसंपदा विभागाच्या ताब्यात द्यावे
पुणे महापालिका आणि जलसंपदा विभाग यांच्यामध्ये पाण्यावरून सुरू असलेली तू तू मैं मैं यापुढील काळात अधिकच वाढण्याची शक्यता आहे. शहराच्या पाण्यावर महापालिका नियंत्रण ठेवत नसल्याने खडकवासला धरणातून दिला जाणाऱ्या पाण्याचा अतिवापर महापालिकेकडून होत असल्याची तक्रार अनेकदा जलसंपदा विभागाकडून करून पाण्याचा अधिक वापर करण्याचे खापर महापालिकेवर फोडले जाते. त्यातच आता जलसंपदा विभागाने महापालिकेशी पत्रव्यवहार करत महापालिकेच्या पंपिंग स्टेशनबाबत मोठी मागणी केली आहे.

‘पुणे शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेचे पंपिंग स्टेशन जलसंपदा विभागाच्या ताब्यात द्यावे,’ असे पत्र खडकवासला पाटबंधारे विभागाने महापालिकेला पाठविले आहे. मात्र, महापालिकेने अद्याप यावर कोणताही निर्णय घेतला नसल्याचे महापालिकेतील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.   

Web Title: Pune Water Supply distribution planning stalled due to lack of appointment of Guardian Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.