मतदार याद्यांमध्ये सुधारणा करून याद्या परिपूर्ण करणार; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती

By नितीन चौधरी | Updated: March 21, 2025 14:15 IST2025-03-21T14:14:56+5:302025-03-21T14:15:10+5:30

याद्या परिपूर्ण करण्यासाठी आगामी काळात प्रयत्न करण्यात येतील, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.

pune Voter lists will be improved and the lists will be perfected; District Collector Jitendra Dudi informed | मतदार याद्यांमध्ये सुधारणा करून याद्या परिपूर्ण करणार; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती

मतदार याद्यांमध्ये सुधारणा करून याद्या परिपूर्ण करणार; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती

पुणे : जिल्ह्यातील सर्व मतदारसंघांतील मतदार याद्यांमध्ये असलेली दुबार नावे, मृत व्यक्तींची नावे, कायमस्वरूपी स्थलांतरित झालेल्या मतदारांची नावे यासंदर्भात माहिती घेऊन मतदार याद्यांमध्ये सुधारणा करण्यात येईल. अशा याद्या परिपूर्ण करण्यासाठी आगामी काळात प्रयत्न करण्यात येतील, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात, मतदार याद्या तयार करण्यासाठी मान्यताप्राप्त राष्ट्रीय व राज्यस्तरीय राजकीय पक्षांच्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला उपजिल्हाधिकारी निवडणूक मीनल कळसकर, विविध राजकीय पक्षांचे जिल्हाप्रमुख व प्रतिनिधी उपस्थित होते. डुडी म्हणाले, “मतदार यादीत दोन ठिकाणी नाव असलेल्या मतदारांची नावे वगळण्यात येऊन एकाच मतदार यादीत नाव असेल याची मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत खात्री केली जाईल. मतदार याद्यांमधील मृत मतदारांची नावे वगळण्यात येतील, यासाठी ग्रामपंचायत, नगर परिषद, महापालिका या कार्यालयांकडून मृत झालेल्या व्यक्तींच्या अभिलेख नोंदीच्या याद्या घेऊन त्याप्रमाणे मतदार यादीमध्ये त्यांची नावे कमी करण्यात येतील, तसेच कायमस्वरूपी स्थलांतरित झालेल्या मतदारांबाबतही बीएलओमार्फत सर्वेक्षण करण्यात येऊन याद्यांमध्ये सुधारणा करण्यात येईल.’

या कामांसाठी प्रशासनातर्फे बीएलओंना प्रशिक्षण देण्यात येईल. मतदार यादीमध्ये चुकीच्या पद्धतीने नाव समावेश केले असेल तर प्रशासनातर्फे त्यात सुधारणा करण्यात येईल. या सर्व कामामध्ये पारदर्शकता ठेवली जाईल. मतदार याद्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी राजकीय पक्षांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असेही आवाहन त्यांनी यावेळी राजकीय पक्षांना केले. बैठकीत विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी, मतदार यादीमध्ये सुधारणा करण्यासाठी महत्त्वाच्या सूचना मांडल्या. बैठकीच्या सुरुवातीला यासंदर्भातील माहितीचे निवडणूक शाखेतर्फे सादरीकरण करण्यात आले.

Web Title: pune Voter lists will be improved and the lists will be perfected; District Collector Jitendra Dudi informed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.